होमपेज › Ahamadnagar › आमदार साहेब, नव्या पिढीशी जुळवून घ्या!

आमदार साहेब, नव्या पिढीशी जुळवून घ्या!

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:50PMपारनेर : विजय वाघमारे

नगरपंचायत पदाधिकार्‍यांच्या निवडीत स्वतःच्याच बालेकिल्यात झालेला पराभव आ. औटी यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 17 पैकी 12 सदस्यांचे पाठबळ असताना 5 सदस्यांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन विरोधकांशी जुळवून घेतले.आ.औटी यांच्या स्पष्टवक्‍ता स्वभावामुळे बंडखोर सदस्य जवळपास दीड ते दोन वर्षांपासून अस्वस्थ होते. त्याच अस्वस्थेतून संधी मिळताच सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकवित बंड यशस्वीही करून दाखविले. खरे तर तरुणांच्या मतांच्या टक्क्याच्या वाढता आलेख पाहता आ. औटी यांनी स्वभावास मुरड घालून नव्या पिढीशी जुळवून घ्यायला हवे. 

नगराध्यक्षपदाचे अर्ज दाखल केल्यानंतर नाराज गटाने अतिशय सावध हालचाली करून विरोधी तसेच नाराज सदस्यांना सहलीवर पाठविले. बंडखोरांच्या हालचालींची आ.औटी यांना चाहूलही लागली होती, मात्र हे सदस्य इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत, विश्‍वासघात करणार नाहीत या भ्रमात ते राहिले. बंडखोरीचे पॅचअप करण्याची दुसर्‍या दिवशी त्यांनी तयारी सुरू केली, त्यावेळी बंडखोरांसह विरोधी सदस्य त्यावेळी थेट नाशिकमध्ये देवधर्म करीत होते. प्रयत्न करूनही बंडखोर अथवा विरोधी सदस्यांना गळाला लावण्यात औटी यांना यश आले नाही. शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार होईल, औटी यांच्या हातून नगरपंचायतीची सत्ता जाणार नाही अशी अनेकांची अटकळ होती, मात्र विरोधी व बंडखोर सदस्य आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले व प्रथमच औटी समर्थक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीचा इतिहास पाहिला तर 17 पैकी 9 सदस्य विजयी झाल्याने शिवसेनेला निसटते बहुमत मिळाले. त्यावेळी मात्र फोडाफोडीच्या हालचाली सुरू होताच औटी यांनी सावध होत पक्षाचे सदस्य सुरक्षित ठेवलेच. शिवाय तिघा अपक्षांनाही आपल्या गोटात घेत नगरपंचायतीतील बलाबल भक्‍कम केले. नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत औटी यांनी पूर्वीच्या ठोकताळ्यानुसार उमेदवार दिले. प्रत्येक प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक तरूण इच्छुक होते. अनेकांनी पूर्वीपासूनच निवडणूकीची तयारी सुरू केलेली होती, मात्र त्यांना डावलण्यात आल्याने अनेक प्रभागात बंडाळी होउन तब्बल 8 विरोधी सदस्य विजयी झाले. खरे तर त्याच वेळी तरुणाईचा कल लक्षात घेउन उमेदवार निश्‍चित झाले असते तर शिवसेनेला एखाद दुसरा अपवाद वगळता निर्भेेळ यश मिळाले असते. 17 प्रभाग झाल्याने प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या अतिशय कमी झाली. कमी मतदारांमधून विजय कसा संपादन करायचा याचा अनुभव तरूणाईस आलेला आहे. ज्येष्ठ नागरीकांपेक्षा तरूणच निर्णायक ठरू लागल्याने आ. औटी यांना तरुणाईच्याच मनाचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे. 

सुरेखा भालेकर यांना नगराध्यक्षपद किंवा चंद्रकांत चेडे यांना उपनगराध्यक्षपद मिळावे अशी भालेकर व चेडे यांची अपेक्षा होती. इतर नगरसेवकांच्या तसे गळी उतरविण्यातही ते यशस्वी झाले होते. मात्र, वैशाली औटी व सुरेखा भालेकर यांना प्रत्येकी सव्वा वर्षांचा कार्यकाल देण्याचा तसेच प्रथम औटी यांना संधी देण्याचा फॉर्म्युला आ. औटी यांनी जाहीर केला  व तेथेच बंडाची ठिणगी पडली. सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय व्हावा अशी बंडखोरांची मागणी होती. परंतु तसे झाले नाही. नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्याची मुदतही संपून गेली. तरीही बंडखोरांची खदखद कायम होती. तशातच चेडे, भालेकर यांच्यात इतर तिघे सामिल झाले. सेनेमध्ये असेलेली खदखद पाहून शंकर नगरे यांनी पत्नी वर्षा यांचा अर्ज दाखल करून धूर्त खेळी करूनच ठेवलेली होती.

बंडखोरांची संख्या पाच झाल्यावर भाजपाचे वसंत चेडे यांनी विरोधक व बंडखोरांना एकत्र करण्यात महत्वाची भूमिका बजावली. जि. प. चे माजी सदस्य सुजित झावरे हे देखील सुप्यात बसून सुत्रे हलवित होते. तर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनीही दि. 18 रोजी पारनेरमध्ये दाखल होत एकत्र झालेले 8 सदस्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. वर्षा नगरे व चंद्रकांत चेडे यांच्या निवडीनंतर विविध पक्षांत श्रेयवादावरून स्पर्धा सुरू झाली असली तरी बंडखोर व विरोधकांनी आपल्या पातळीवर केलेल्या तडजोडीचे हे यश आहे.