Tue, Sep 25, 2018 07:17



होमपेज › Ahamadnagar › नगर लोकसभा राष्ट्रवादीकडेच!

नगर लोकसभा राष्ट्रवादीकडेच!

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:44PM



श्रीगोंदा : प्रतिनिधी 

नगर लोकसभा मतदारसंघाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही. येथे राष्ट्रवादीचाच खासदार होईल, असे सांगत  श्रीगोंदा-नगर मतदारसंघात राहुल जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असून, तेच आमदार होतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. आ. अजित पवार  म्हणाले की,  गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बारामतीची जागा गेली तरी चालेल पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील, यासाठी व्यूहरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, तुकाराम दरेकर यांनी त्यासाठी सहकार्य केले . अन् राहुल जगताप आमदार झाले. आता 2019च्या निवडणुकीत आ. राहुल जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि तेच पुन्हा आमदार होतील, असे सांगितले.

आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, ते तिकडे गेले. मात्र, त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे, हे तुम्ही जवळून पाहत आहात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप व वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत, कर्जमाफी करण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले की, नगरच्या जागेच्या बदल्यात इतर ठिकाणची जागा द्यायची, अशा स्वरूपाची चर्चा चालू असल्याची माहिती मिळाली. पण, असला प्रकार आपल्याला चालणार नसून, नगर दक्षिणेतून खासदार हा राष्ट्र्वादीचाच होईल, असे स्पष्ट केले.