Sat, Apr 20, 2019 18:44होमपेज › Ahamadnagar › देवळाली, वांबोरीला तालुक्याची संधी !

देवळाली, वांबोरीला तालुक्याची संधी !

Published On: Feb 09 2018 1:58AM | Last Updated: Feb 08 2018 10:14PMरियाज देशमुख, राहुरी

रा ज्यात नगर जिल्हा विभाजनाच्या चर्चेत राहुरीकर श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अनुकूल आहेत. मात्र, श्रीरामपूर जिल्हा झाल्यास देवळाली प्रवरा व वांबोरीलाही ‘तालुका’ होण्याचे डोहाळे लागल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्हा विभाजनाच्या चर्चेला जोर आला आहे. त्यातच महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा दौर्‍यानंतर हे वातावरण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत राहुरीकरही नवीन जिल्ह्याचे विभाजनाबाबत लक्ष ठेवून आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम श्रीरामपूर आणि त्यानंतर शिर्डीला प्राधान्य दिले जात आहे. 

वास्तविकता, राहुरी तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ आहे. हेच देशातील उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ तयार होण्याचे मोठे केंद्र आहे. विशेष म्हणजे 10 जिल्ह्यांचे काम याच राहुरी विद्यापीठातून पाहिले जाते. याशिवाय मुळा धरणाचे मोठे वरदान लाभल्याने सुजलाम सुफलाम तालुका म्हणून राज्यात राहुरीचा नावलौकीक आहे. शिर्डी व शनिशिंगणापूर येथील जागतिक दर्जाचे देवस्थानाच्या मध्यवर्ती ठिकाणी हा राहुरी तालुका वसलेला आहे.  त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन सुरू असताना राहुरीही कुठे कमी नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. मात्र सध्या जिल्हा विभाजनात भौगोलिक व प्रशासकीय सोयीसुविधांचा अभ्यास करता श्रीरामपूर जिल्ह्यासाठी राहुरीकर अनुकूल आहेत. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी राहुरीतील अनेक जणांनी देव पाण्यात बुडवले आहेत. अर्थात, यासाठी देवळाली प्रवराकर आपल्या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आग्रही आहेत तर वांबोरीकरही जिरातय भाग, तालुक्याचा शेवटचे टोक असल्याने स्वतंत्र तालुक्याचे स्वप्न रंगवत आहेत. देवळाली येथील कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांना श्रीरामपूर जिल्हा व्हावा व देवळाली प्रवरा तालुका करावा, यासाठी माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी गळ घातल्याचे जिल्ह्याला पहायला मिळाले. देवळाली तालुका झाल्यास आपलीही राजकीय सोय होईल, अशी कबुलीही देवून त्यांनी मुलाच्या राजकीय कारर्कीदीसाठी जिल्हा विभाजनाला राजकीय झालर दिली होती.  यावेळी उत्तरेत भाजपाचे गड किल्ले वाढवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यास दुजोरा दिल्याने देवळालीकरांच्या आशा उंचावलेल्या आहेत. तसे पाहिले तर देवळालीत नगरपरिषद आहे, लगतच राहुरी कारखाना आहे, शिवाय श्रीरामपूरला जोडलेल्या 32 गावांनाही हक्काचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा हा नवीन तालुका होण्यासाठी सर्वाधिक दावेदार आहे.

देवळालीबरोबरच नवीन तालुक्यासाठी वांबोरीही स्पर्धेत असणार आहे. मात्र देवळालीवर भाजपाची कृपादृष्टी बर्‍यापैकी असल्याने विरोधी पक्षनेत्यांच्या वर्चस्वात असलेल्या वांबोरीची चर्चा जरा मागेच पडली आहे. खरतरं, वांबोरी येथेही मोठी बाजारपेठ आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीची  उपशाखा आहे. व्यापार, उद्योगाला येथेही चालना मिळणे शक्य आहे. 

तालुक्यातील इतर शहरांप्रमाणे वांबोरीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वांबोरीला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी एक प्रवाह वेगात वाहत आहे. मतदार संघाच्या रचनेत देवळाली प्रवरा व 32 गावे व बा. नांदूरसह पश्‍चिमेची गावे राहुरीला जोडून पूर्वेकडील 38 गावे वांबोरीला जोडण्याचा पर्याय असणार आहे. तसेच गडावरील काही गावेही वांबोरीला जोडणे शक्य होणार आहे. यासाठी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी मात्र याविषयी अद्याप खुली भूमिका मांडली नसली तरी तसे झाल्यास हा वांबोरीचा गौरव असणार आहे.