Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Ahamadnagar › मनपा प्रभागरचना 27 ऑगस्टला

मनपा प्रभागरचना 27 ऑगस्टला

Published On: Jul 28 2018 1:31AM | Last Updated: Jul 27 2018 10:49PMनगर : प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत असलेला महापालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार 27 ऑगस्टला प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत यावर हरकती मागविण्यात येणार असून, 1 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

विद्यमान महापालिकेची मुदत 29 डिसेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने, आयोगाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा असलेल्या प्रभागरचनेचा कार्यक्रम आयोगाने काल जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेला 7 ऑगस्टपर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षण निश्‍चित करुन, त्यानुसार प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्‍त, मनपा आयुक्‍त व जिल्हाधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीकडे हा प्रस्ताव सादर होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाकडून या प्रस्तावास 18 ऑगस्टपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर, 21 ऑगस्ट रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आदी आरक्षणाची सोडत काढण्यासाठी नोटीस प्रसिद्ध होणार आहे. 24 ऑगस्ट रोजी आक्षण काढण्यात येवून, आरक्षणासह 27 ऑगस्टला प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचनांसाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. प्राप्त हरकतींवर 15 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर सदरच्या हरकती शिफारसींसह निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. आयोगाकडून 28 सप्टेंबरपर्यंत निर्णय दिला जाणार असून, त्यानंतर 1 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

प्रभाग रचनेला उत्तरेकडून सुरुवात!

आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रभागरचना केली जाणार आहे. उत्तरेकडून सुरुवात होऊन ईशान्येकडे (उत्तर-पूर्व), त्यानंतर पूर्व दिशेकडे येवून पूर्वेकडून पश्‍चिमेकडे प्रभागरचना करत सरकावे व शेवट दक्षिणेकडे करावा, असे आयोगाने दिलेल्या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभागांचे क्रमांकही याचनुसार दिले जाणार असून, प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुमारे 20 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग?

महापालिका हद्दीची सध्याची लोकसंख्या 3 लाख 50 हजार 600 आहे. आयोगाच्या निर्देशानुसार 2011 च्या जनगणनेच्या प्रगणक गटांच्या आधारावर प्रभागरचना केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या, महापालिकेची सदस्य संख्या व प्रभागातील सदस्य संख्येच्या आधारावर अंदाजे 20 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार केला जाऊ शकतो.