Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Ahamadnagar › ‘एनजीटी’चे आदेश धाब्यावर!

‘एनजीटी’चे आदेश धाब्यावर!

Published On: Mar 07 2018 1:38AM | Last Updated: Mar 07 2018 1:26AMनगर : प्रतिनिधी

बुरुडगाव कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बायो मेंथानायझेशन प्रकल्पाची उभारणी न झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ टाकण्यासाठी मनपाला मनाई केलेली आहे. असे असतांनाही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्याधिकार्‍यांनी हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसवत बुरुडगाव कचरा डेपोत मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आदेश 1 मार्च रोजी दिले आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर 31 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ टाकल्याचे व त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याचे छायाचित्रांद्वारे राधाकिसन कुलट यांनी निदर्शनास आणून दिले होते. लवादाने त्याची गंभीर दखल घेत 27 ऑक्टोबर 2017 रोजी सावेडी व बुरुडगाव कचरा डेपोत प्रकल्प उभा होईपर्यंत अनिमल वेस्ट न टाकण्याचे दिलेले आदेश पुन्हा कायम केले होते. तसेच प्रकल्पाचे काम झालेले नसल्याने ते मार्गी लावण्यासाठी 50 लाख रुपये जिल्हाधिकार्‍यांकडे जमा करण्याचे आदेशही लवादाने 31 जानेवारीलाच दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रस्तावित असलेली सुनावणी न झाल्यामुळे मार्च महिन्यात सुनावणी होणार आहे. लवादाने आदेश दिल्यानंतर अद्यापही सुनावणी झालेली नसल्याने आदेश कायम आहेत. ‘अनिमल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्तावित असलेला बायोमेंथानायझेशन प्रकल्पही अद्याप कागदावरच आहे. असे असतांनाही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्याधिकार्‍यांनी बुरुडगाव कचरा डेपोत घेण्यात आलेल्या खोल खड्ड्यात शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आदेश डेपो प्रमुख बी. एच. भोर यांना पाच दिवसांपूर्वी बजावले आहेत. त्यामुळे निर्ढावलेल्या मनपा अधिकार्‍यांनी हरित लवादालाही ‘कोलदांडा’ घातल्याचे चित्र आहे. मनपा अधिकार्‍यांच्या या उठाठेवीमुळे याचिकाकर्त्यांना मात्र आयते कोलित मिळाले आहे.

दरम्यान, मनपाकडून बायोमेंथानायझेशन प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदाही राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्या आहेत. सुमारे दीड कोटींचा हा प्रकल्प असून निविदाकारांनी जादा दराचे अंदाजपत्रक दिल्याची चर्चा आहे.