Sun, May 31, 2020 05:49होमपेज › Ahamadnagar › शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी उतरणार : वैभवराव पिचड 

शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी उतरणार : वैभवराव पिचड 

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 04 2018 11:56PMअकोले : प्रतिनिधी

शेतीमालाला भाव नाही, साखर व दुधाचे भावही कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पूर्णतः उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा एकदा संपावर गेला आहे. या संपात 22 राज्यांतील शेतकरी सहभागी झाले असून, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून, दोन-तीन दिवसांत सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास आमचा पक्षही रस्त्यावर उतरेल, असा इशारा आ. वैभवराव पिचड यांनी दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पिचड यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंत आभाळे उपस्थित होते. 

आ. पिचड म्हणाले की, या सरकारने त्यांनीच केलेल्या घोषणांची फक्त अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे. शेतकर्‍यांची सध्याची अवस्था पाहता शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. हे सरकार असंवेदनशील झाले आहे. लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याला आत्महत्या करायला लावणारे हे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकर्‍याला वारंवार संपावर जावे लागत आहे. प्रत्येकवेळी सरकार खोटे आश्वासने देत आहे. हे सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठले असून देशात साखर, गहू, तूर यांचे जास्त उत्पादन असतानाही निर्यातीला चालना देण्याऐवजी बाहेरच्या देशातून साखर, गहू, तूर आयात करून शेतकर्‍यांना व साखर कारखानदारीला अडचणीत आणले आहेत. दुधाला भाव नसल्याने शेतकर्‍यांना गायी विकाव्या लागत आहेत. भाकड गायी सांभाळण्याची ऐपतही शेतकर्‍यांमध्ये राहिलेली नाही. यामुळे शेतकरी लाखो लिटर दूध भाव नसल्याने रस्त्यावर ओतून देत आहे. तरीही सरकार गंभीर दिसत नाही.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना अतिरिक्त दुधाबाबत दुधाला भाव मिळावा म्हणून दूध भुकटीला चालना देऊन अनुदान दिले होते. शेतकर्‍यांच्या दुधाला भाव दिला, अतिरिक्त दूध शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी अनुदान दिले. मात्र, हे सरकार असे कोणतेही धोरण घेतांना दिसत नाही. सरकारने दुधाला 27 रुपये भाव द्यावा, अशी घोषणा केली. मात्र, सरकारने त्यासाठी 5 रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खाती वर्ग करावे, अशी आग्रही मागणी वैभवराव पिचड यांनी केली.

जनावरांच्या लाळ्याखुरकत रोगासाठी लागणार्‍या लसी गेल्या एक वर्षापासून उपलब्ध नाही. या रोगामुळे शेतकर्‍यांची हजारो जनावरे दगावली असून जवळपास एका गायीच्या मागे शेतकर्‍यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. जनावरांच्याबाबतही हे सरकार इतके संवेदनाहिन झाल्याची टीका त्यांनी केली. भाताच्या पिकाचे रोगाने मोठे नुकसान झाले होते. तसेच कपाशीवर बोंड अळीचा प्रश्न उद्भवला असतानाही अडचणीत आलेल्या शेतकर्‍याला सरकारने कुठलीही मदत केली नाही. पीकविम्याचे पैसेही शेतकर्‍यांना मिळाले नाही.

देशामध्ये यापूर्वी शेतकर्‍यांचा न भूतो न भविष्यती असा देशव्यापी संप  झाला, तरीही सरकारने खोटे आश्वासने देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसले. शेतकर्‍यांनी छोट्या छोट्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई तळपायातून रक्त येऊपर्यंत अनवाणी लाँग मोर्चा काढला, त्यांच्याही तोंडाला या सरकारने पाने पुसली. ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांचे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी आंदोलन झाले, त्यांच्याही आंदोलनाला या सरकारने जुमानले नाही. असा आरोप आ. पिचड यांनी यावेळी केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.