Fri, Aug 23, 2019 21:05होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस थांबेना!

राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस थांबेना!

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:17AMशेवगाव : रमेश चौधरी

शेवगाव नगरपरिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदात बदल होऊन तेथे नगरसेवक सागर फडके यांची निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिल्याने नगराध्यक्षावर पक्षाच्या काही नगरसेवकांनी अविश्‍वास व्यक्त केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. तर या गटनेतेपदाला पुन्हा सुरुंग लावण्याच्या खलबती दुसर्‍या गटाने सुरु केल्या आहेत. यात मात्र राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे.

शेवगाव नगरपरिषदेत गत दोन वर्षांपासून विकासाऐवजी राजकारणावर जादा भर दिला जात आहे. कोण सत्ताधारी, कोण विरोधक हा फक्त देखावा राहिला आहे. तुम्ही जगा दुसर्‍याला जगू द्या, हा संदेश घेऊन काही सत्ताधारी व विरोधक गुंफले गेले आहेत. परिषदेच्या निधीचे बाजारीकरण करून त्यासाठी पक्षनिष्ठेचा लिलाव मांडला जात आहे. तीन अपक्ष नगरसेवकांच्या सहकार्याने परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आली खरी पंरतु आज हे तिन्ही नगरसेवक स्वाभिमानाला मुकले आहेत. नगराध्यक्षांचा एक हाती अंमल त्यांना सतावत आहे. याकडे पक्षाचे नेतृत्व दुर्लक्ष करीत आहे.तक्रारी केल्या तरी मागचे पाढे पुढे चालूच आहेत.

शहरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून एक हाती सत्तेची पंरपरा जडली आहे.ही लालूच हिसकावणे तेवढे सोपे राहिले नाही. या कारणाणे काही राजकीय बळी गेल्याचा इतिहास आहे. तू मोठा कि मी मोठा अशी स्पर्धा करणार्‍यां रावांचा येथे टिकाव लागला नाही. ‘नेतृत्व राजी तर क्या करेंगी नाराजी’ याचा प्रत्यय अनेक वेळा आल्याने मी मी म्हणणार्‍यांना हात टेकावे लागले आहेत.विरोधकही पक्षापुरते उरले आहेत. त्यांचा ‘वरून कीर्तन नि आतून तमाशा’ असा खेळ सुरू आहे.

आता नगरपरिषदेत हेच राजकारण धुमसत आहे. या संस्थेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी  बहुमत नसताना 3 अपक्ष नगरसेवकांच्या सहकार्याने येथे राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली. विद्याताई लांडे यांची  गटनेतेपदी निवड करून नगराध्यक्षपद त्यांनाच बहाल केले खरे मात्र याच वेळी काही नगरसेवकांनी कच खाल्ली होती. पंरतु त्याचा डागोंरा करता आला नाही. एक वर्षानंतर निधीमुळे वाद धुमसत राहिले.एक हाती सत्तेच्या सवयीने नगराध्यक्षांना इतर नगरसेवकांना विश्‍वासात घेण्याची आवश्यकता वाटली नाही. त्याचा परिणाम सार्वजनिक सुविधावर झाला हेच कारण पुढे करून राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बाजूला गेले. त्यांनी आपला स्वंतत्र गट केला. राष्ट्रवादीवर निष्ठा असलेले परंतु अपक्ष असणारे नगरसेवक सागर फडके यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष यमुनाबाई ढोरकुले, बांधकाम समिती सभापती अजय भारस्कर, आरोग्य सभापती वर्षा लिंगे, पाणी पुरवठा सभापती इंदुबाई म्हस्के, नगरसेवक विकास फलके, शब्बीर शेख यांनी नविन गटनेते पदासाठी सागर फडके यांची शिफारस करून जिल्हाधिकारी यांच्याकडे 27 मार्च रोजी प्रस्ताव सादर केला. याची सुनावणी व पडताळणी होऊण सागर फडके यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी 18 एप्रिल रोजी दिले आहे.

या निर्णयाने पूर्वीच्या गटनेत्याचे अधिकार संपुष्टात आल्यागत झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे.तीन ते चार महिन्यात नविन नगराध्यक्ष- उपनगराध्यक्षांची निवड होणार असल्याने ही राजकीय खेळी सुरू झाली आहे. शहराचा विकास व्हावा व एक हाती सत्तेची सवय बाजूला पडावी हा मूळ हेतू ठेऊन गटनेता बदल केला असला तरी फुटीर नगरसेवक कितपत तग धरतील हे महत्वाचे आहे. हाच धागा पकडून सत्ताधारी गटाने पुन्हा आपली चाल दाखविण्याची खलबत सुरू केली आहे.आठवडाभरात याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. काही झाले तरी राष्ट्रवादीच्या दोन गटात चाललेली ही कुरघोडी शहरात करमणुकीची विषय झाला आहे.        

 

Tags : ahamadnagar, Shevgaon news, NCP internal, disput,