होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीला झटका, भाजपाचा विचार पक्का!

राष्ट्रवादीला झटका, भाजपाचा विचार पक्का!

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 06 2018 11:56PMशेवगाव : रमेश चौधरी

सत्तेचे समीकरण जुळविण्यास राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी अडसर ठरत असल्याचे नगरपरिषद सत्तातंराने अधोरेखित झाले आहे. याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत चालला आहे. मात्र, आजची सत्ता उद्या बदलू शकते, त्यामुळे भाजपानेही हवेत राहू नये असा सबुरीचा सल्ला दिला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमत आहे. पंचायत समिती, बाजारसमिती, खरेदी-विक्री संघाबरोबर ग्रामपंचायती, सहकारी सोसायटी अशा संस्थेवर वर्षानुवर्ष राष्ट्रवादी सत्ता करीत आहे. स्थानिक सत्तेसाठी गावागावात याच पक्षाचे दोन गट समोरासमोर येत असल्याने त्याचे रुपातंर गटबाजीत झाले. भविष्याच्या राजकारणासाठी ही गटबाजी संपुष्टात यावी म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन मिळत गेल्याने ‘तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ’ अशी स्पर्धा निर्माण झाली. पक्ष नेतृत्वासमोर आपलीच चलती असावी म्हणून गावात वादविवाद होऊ लागले.

पक्षात एकनिष्ठतेचा अभाव निर्माण झाला. मतलबासाठी जवळ गेलेले विश्वासू झाले. ठराविक व्यक्तींनाच वर्षानुवर्षे झुकते माप मिळत राहिल्याने एकनिष्ठ  कार्यकर्ते बाजूला सारले गेले. यापैकी काहींनी पक्ष सोडला तर काहींनी राजकारणालाच रामराम केला. दुखावलेली मने शरीराने राष्ट्रवादीकडे तर मनाने विरोधात गेली. गावात घुलेंना मताधिक्य मिळाल्यास एका गटाची प्रतिष्ठा वाढू नये म्हणून दुसरा गट आपोआप विरोधी सहकार्य करू लागला. या बेगडी प्रेमाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला.

गावागावांत दिसणार्‍या गटबाजीची झळ तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या नगरपरिषदेत पोहचली. त्यातून हे सत्तातंर झाले. राष्ट्रवादीच्याच एका गटाने भाजपाला पडद्याआड सहकार्य केल्याने चाळीस वर्षांचा इतिहास कोलमडला. पूर्वी गटातटात विभागलेल्या भाजपाला तोंडी लावण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी नेतृत्वाला नगरसेवकांनी टाकलेला डावपेच पाहण्याची वेळ आली. ऐन लोकसभा विधानसभा निवडणूक पूर्व हालचालीवर नगरपरिषदेवर आलेली भाजपाची सत्ता राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. जिरवाजिरवीच्या राजकारणात एकमेकांना जिरविणार्‍यांचीच जिरली गेल्याने पश्चतापाची वेळ आली आहे.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षासह काही जिल्हास्तरीय पदाची जबाबदारी या तालुक्यावर असताना जिल्हाध्यक्ष वगळता हे पदाधिकारी पदापुरतेच उरले आहेत. पक्षबांधणी अथवा सत्तेसाठी यांचे योगदान दुर्मिळ झाल्याने ही कार्यशैली कार्यकर्त्यांना निरुत्साही ठरत आहे. ‘होमपिच’वर अचानक झालेल्या सत्ताबदलाची आता आपआपल्या सोईनुसार व्यर्थ गणिते मांडली जाऊन कार्यकर्ते समाधान शोधित आहेत.सत्तेच आलेल्या भाजपानेही हवेत राहू नये. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि दुश्मनही नसतो. त्यामुळे आजची सत्ता उद्या बदलते. नगरपरिषदेवर आलेली सत्ता भाजपात उत्साह वाढविणारी असली तरी  नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षासह नगरसेवकांना जनतेच्या अपेक्षेप्रमाणे कारभार करण्याचे मोठे अग्निदिव्य पार पाडावे लागणार आहे. अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’चा कित्ता गिरवल्यास हे अळवावरचे पाणी वाहून जाण्यास वेळ लागणार नाही.