Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दरवळणार कमळाचा सुगंध?

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दरवळणार कमळाचा सुगंध?

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 10:27PMशेवगाव : रमेश चौधरी

राष्ट्रवादीच्या दहिगाव बालेकिल्ल्यात आमदार राजळे यांचा गनिमीकावा चालू असून, या भागात राजकीय भूकंप घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.शेवगाव तालुक्याचा दहिगाव गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याबाबत कुणालाही शंका नाही. येथे ‘राजा बोले दल हाले’ अशीच काहीशी परिस्थिती असल्याने भास होत नसणारेही राजकीय पदाधिकारी झाले. यात अपवाद वगळता सर्वच कटपुतलीचे बाहुले होते. हा हुकमी गट काबीज करण्यासाठी अनेक विरोधकांनी हातपाय खोडले पंरतु अपयश ही पांढरी रेघच ठरली गेली. स्व.मारुतरावजी घुले यांचा या भागात आदरयुक्त आधार होता. त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. कारण त्या शब्दाला विकासाची धार होती. आता त्यांच्या पश्‍चात ही धार हळूहळू बोथट होत चालली असून, मानपान केवळ देखाव्या पुरता उरला आहे.

दहिगाव गटात विरोधकांना स्थानिक निवडणुकीत उमेदवारांची चणचण होती. त्यामुळे बाहेरचा धाडसी उमेदवार पराभवाचे किरण घेऊन आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता. या भागात ताराचंद लोंढे हाच एकमेव व्यक्ती खंबीर विरोधक म्हणून गणला गेला. पुढे माजी आमदार तुकाराम गडाख यांच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब कोल्हेंची त्यांना साथ मिळाली. स्थानिक विरोधकांची फळी हळूहळू पसरत गेली. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीला वीस ते बावीस हजाराचे असणारे मताधिक्य घटत गेले. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात स्थानिक उमेदवारांत स्पर्धा निर्माण झाली.

आता भाजपा आमदार मोनिकाताई राजळे ह्या दहिगाव भागात पाऊल टाकले आहे. रांजणी येथे झालेले शाखा उद्घाटन, खुद्द दहिगाव गावात झालेला शिरखुरमा कार्यक्रम आणि शहरटाकळीत सभामंडप लोकार्पण सोहळ्यास चांगला प्रतिसाद मिळाला.  गेल्या सहा महिन्यांपासून नगर- दहिगाव या मुक्कामी एसटी बसचा भातुकडगाव- शहरटाकळी मार्ग बदलला होता. तो पूर्ववत सुरू करून त्यांना गंगथडी परिसराची वाट सापडल्याने व घड्याळाच्या काट्याला कमळाचा सुगंध येऊ लागल्याने त्यांनी या भागात राजकीय जाळे टाकण्यास सुरवात केली आहे. या जाळ्यात कोणकोण अडकणार हा पुढचा विषय असला तरी भविष्याचा वेध घेता राष्ट्रवादीतील नाराज अप्रत्यक्षरीत्या जाळ्याला लटकण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला दुभांगला जात असताना या भागाबाबत श्रेष्ठींचा आत्मविश्‍वास अद्यापही ठाम आहे. हा पट्टा सुजलाम सुफलाम आहे. मात्र, कार्यकर्त्यात असणार्‍या अंतर्गत मतभेदाने पक्ष विखुरला गेला आहे. नेमकी याचाच फायदा उचलत आ. राजळे यांनी या भागात आपले लक्ष केंद्रीत केल्याने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. इकडील गावागावात कार्यकर्ते तयार होत आहेत. स्थानिक ग्रामपंचायत अथवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट त्यांची मदत घेत असल्याने आपोआपच भाजपा विणला जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे श्रेष्ठी सध्यातरी शांत आहेत परंतु पक्ष फाटत आहे. ऐनवेळी कुठेकुठे शिवणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हुकमी भाग म्हणून हा चुटकीत एकसंघ होईल, असा आशावाद असला तरी युवा पिढी आता दबावाखाली जात नाही. त्यामुळे याला वेळीच आवर घालणे पक्षाच्या हिताचे ठरणार आहे.