Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Ahamadnagar › अविश्‍वास ठरावाने राजकीय भूकंप

अविश्‍वास ठरावाने राजकीय भूकंप

Published On: Jun 09 2018 1:32AM | Last Updated: Jun 09 2018 12:33AMशेवगाव : रमेश चौधरी

नगराध्यक्षांवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने राष्ट्रवादी पक्षांतर्गत राजकीय भूकंप झाला आहे. जिल्हाध्यक्षांच्या हुकमी नगरपरिषदेतच या राजकीय घडामोडीने पक्षाची नाचक्की झाली आहे. भाजपाने थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या वर्षभरापासून नगराध्यक्षांबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीत चाललेल्या वादळाचे गुरुवारी अविश्वास ठराव दाखल करून चक्रीवादळात रूपांतर झाले. आलेला निधी खर्च होत नाही. नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. हा मुद्दा यासाठी पुढे केला असला, तरी खरे कारण मात्र वेगळेच असल्याच्या चर्चा सध्या शहरात झडत आहेत. एक महिन्यापूर्वी 7 नगरसेवकांना विश्वासात घेत एका राष्ट्रवादी प्रणित अपक्ष नगरसेवकाने गटनोंदणीत बदल करून नाराजीचे वादळ उठवून दिले होते. त्यावर संबंधित नगरसेवक व नगराध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने या वादळाने आणखीनच वेग घेतला.
अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष बदलाचा कालावधी आता फक्त महिना ते दोन महिने राहिला असताना हा अविश्वास ठराव एक दिवस तरी नगराध्यक्षांना पदावरून पायउतार करण्याची तड पूर्ण करण्याच्या जिद्दीने झाला आहे. आठ दिवसांपासून अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. हा ठराव दाखल करता येऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या एका गटाने काही नगरसेवकांना पुणेकरांच्या साथीला नेले होते. मात्र ठराव दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्या हातावर नाट्यमय तुरी देऊन नगर गाठले आणि ठरावात सामील झाले.

राष्ट्रवादीचे नाराज नगरसेकांच्या तक्रारीची पक्षनेतृत्व दखल घेत नव्हते. म्हणून हा गट भाजपाच्या आ. मोनिका राजळे व खा. दिलीप गांधी यांच्या संपर्कात होता. ठरावाच्या दिवशी काही वेळ यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करावा अथवा असणार्‍या 15 नगरसेवकांची स्वंतत्र गटनोंदणी करावी, असे मत प्रदर्शित करण्यात आले. जो गट कमळाच्या झेंड्याखाली येईल, त्यास आमचा पाठिंबा राहिल, ही अट ठेऊन भाजपाचे नगरसेवक अविश्वास ठरावात सहभागी झाले.

शेवगाव हा राष्ट्रवादी पक्षाचा हुकमी तालुका आहे. जिल्हाध्यक्षपदाची धुरा याच तालुक्यावर आहे. नगरपरिषदेसह इतर स्थानिक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना केवळ काही चुकीच्या निर्णयाने पदाधिकारी नेतृत्वाच्या आदेशाला जुमानत नाहीत, हे या घडामोडीने स्पष्ट होत आहे. 

तर थांबता थांबेना आता थांबावे कसे म्हणून पक्षातंर्गत शक्तीची फूस अविश्वास दाखल करणार्‍या नगरसेवकांना असावी, असाही संशय सध्या व्यक्त केला जात असून अविश्वास ठराव दाखल करणारा राष्ट्रवादीचा गट सध्या गायब झाला आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या होमगाऊंडवर तालुक्यात पक्षांतर्गत उफाळलेला हा वाद भविष्यात पक्षाला हानीकारक ठरणारा आहे. वेळीच याची दखल घेऊन नगरसेवकांच्या शंकेचे निरसण झाले असते तर ही नाचक्की होण्याची वेळ आली नसती. या राजकीय घडामोडीने पक्षाचे कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत.