Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Ahamadnagar › आरोपी लोटकेने दिली 10 लाखांची लाच

आरोपी लोटकेने दिली 10 लाखांची लाच

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 10:30PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील आरोपी सचिन लोटके याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना लाचेपोटी 10 लाख रुपये वाटप केल्याचा तपशील दिला आहे. तसेच लोटके याच्या घरझडतीत पथदिव्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश पोलिसांना प्राप्त झाले आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिसांनी काल (दि. 5) न्यायालयात दिली.  पथदिव्यांची कामे करणारा ठेकेदार सचिन लोटके याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी दुपारी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एम. कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने लोटके याच्या कोठडीत गुरुवारपर्यंत (दि. 8) वाढ केली आहे. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत 7 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती.

न्यायालयात बोलताना सपकाळे म्हणाले की, आरोपी लोटके याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्याच्या घरात पथदिव्यांच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाने दिलेल्या कार्यारंभ आदेशाच्या प्रती मिळालेल्या आहेत. तसेच त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात तत्कालिन विद्युत विभागप्रमुख अभियंता रोहिदास सातपुते याला 5 लाख रुपये, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे याला 50 हजार रुपये व इतर अधिकारी, कर्मचार्‍यांना साडेचार लाख रुपये असे तब्बल 10 लाख रुपयांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. लोटके याने कामासाठी नियुक्त केलेले सबठेकेदार अंकुश बोरुडे व संकेत कराड या दोघांच्या संयुक्त बँक खात्यावर त्यांनी केलेल्या कामाचे 12 लाख रुपये दिल्याचे सांगितलेले आहे.

त्या अनुषंगाने पोलिसांना आणखी तपास करावयाचा आहे. त्याबाबत संबंधितांकडे चौकशी करून खातरजमा करायची आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. गुन्ह्यातील फरार आरोपी सातपुते, सावळे या दोघांना अटक करणे बाकी आहे. आरोपी लोटके हा तपासात असहकार्य करून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शिवजयंती व इतर धार्मिक उत्सवांच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना तपासाला पुरेसा वेळ मिळालेला नाही. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी न्यायालयाकडे केली. आरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी लोटके याच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ केली आहे. 

लोटकेच्या जबाबानुसार 22 लाखांचे वाटप

पथदिव्यांच्या 34 लाखांची कामे करण्याचा ठेका लोटके याला मिळाला होता. त्याने कामासाठी नियुक्त केलेले सबठेकेदारांना काम केल्यापोटी 12 लाख रुपये अदा केले. तसेच कामे व बिलांच्या मंजुरीसाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना 10 लाख रुपयांची लाच दिली. त्याने जवळपास 22 लाख रुपयांचे वाटप केले. उर्वरीत 12 लाख रुपयांचा फायदा त्याला झालेला असू शकतो, असे त्याच्या जबाबातून दिसून येते.