Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Ahamadnagar › नगर शहरातही कचराकोंडी!

नगर शहरातही कचराकोंडी!

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:06AMनगर :  प्रतिनिधी

महापालिकेचा बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करुन संपूर्ण शहरातील कचरा सावेडी डेपोत पाठविण्यात येत आहे. मात्र, तेथेही संपूर्ण कचर्‍याची विल्हेवाट लागत नसल्याने कचर्‍याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी सुटली असून, सावेडीचा कचरा डेपो तात्काळ बंद करुन इतरत्र हलवावा, तेथील कचर्‍याची तात्काळ विल्हेवाट लावावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक संपत बारस्कर व स्थानिक नागरिकांनी काल (दि.19) दुसर्‍यांदा आंदोलन करुन डेपोत जाणार्‍या गाड्या अडविल्या. आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी इतरत्र जागेचा पर्याय शोधून शासनाकडे जागेची मागणी करण्यात येईल व 8 दिवसांत तेथील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतरही आंदोलन सुरुच ठेवण्यात आले होते.

संपूर्ण शहरातून दररोज सुमारे 125 मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. या कचर्‍यावर प्रक्रिया करुन खतनिर्मिती करण्यासाठी मनपाने बुरुडगाव रोड येथे 50 मे.टन व सावेडी येथे 100 मे.टन क्षमतेचे खतनिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. खतनिर्मितीसाठी उपयुक्‍त नसलेल्या अविघटनशील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्ही डेपोत ‘लॅण्डफिल साईट’ही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बुरुडगावचा खतनिर्मिती प्रकल्प बंद झाला आहे. या प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदा राजकीय कुरघोड्यांमुळे रद्द झाल्या. नव्याने निविदा मागविण्यात आल्यावर 4 निविदा प्राप्त होवूनही, अद्याप त्या उघडण्यात आलेल्या नाहीत. तसेच जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यावर नवीन निविदा मंजूर होईपर्यंत त्याला मुदतवाढ देणे बंधनकारक आहे. मात्र, तीही देण्यात आलेली नाही. परिणामी, शहरातील सर्व कचरा सावेडी डेपोतच टाकण्यात येत आहे.

बुरुडगावचा डेपो बंद झाल्यामुळे सावेडी कचरा डेपोत लोड वाढला आहे. त्यातच खतनिर्मितीनंतर शिल्लक राहणार्‍या अविघटनशील कचर्‍याची विल्हेवाट ज्या लॅण्डफिल साईटवर लावण्यात येते, तेथे कचरा नेऊन टाकण्याची परवानगीच मनपाने संबंधित ठेकेदाराला दिलेली नसल्याने डेपोतच या कचर्‍याचे ढीग साचले आहेत. दररोज येणारा कचरा व अविघटनशील कचरा एकाच ठिकाणी टाकण्यात येत असल्याने व त्यावर पूर्णपणे प्रक्रिया होत नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे सदरचा सावेडी डेपो तात्काळ बंद करुन, इतरत्र हलवावा व तेथील सध्याच्या कचर्‍याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नगरसेवक बारस्कर यांनी केली.

आयुक्‍त घनश्याम मंगळे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे यांनी घटनास्थळी जावून नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर शहराबाहेर 15 ते 20 किलोमीटर अंतरावर कचरा डेपोसाठी शासनाकडे जागेची मागणी करण्यात येईल व सद्यस्थितीत अविघटनशील कचर्‍याची येत्या 8 दिवसांत विल्हेवाट लावण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन आयुक्‍तांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, नगरसेवक बारस्कर, सारंग पंधाडे, सुरेश बनसोडे यांना दिले. त्यानंतरही आंदोलन सुरुच ठेवण्यात आले असून, सावेडीत कचरा टाकू देणार नसल्याचे बारस्कर यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.