Sun, May 26, 2019 01:19होमपेज › Ahamadnagar › ‘भाजपमुळे शिवसेनेच्या वाघाची झाली शेळी’

‘भाजपमुळे शिवसेनेच्या वाघाची झाली शेळी’

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 05 2018 1:59AMनगर  : प्रतिनिधी

महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पथदिव्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेने पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोणी देव पाण्यात घातले हेही नगरकरांनी पहिले. मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नसल्याचा खुलासा करत शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी घुमजाव केले आहे. स्वपक्षातून मिळालेल्या कानपिचक्यांमुळे आणि आक्रमक भाजपमुळे शिवसेनेच्या वाघाची शेळी झाल्याचे चित्र आहे. महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने महापौर कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.

यात शहरप्रमुख सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांमुळेच गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे वक्‍तव्य केले होते. भाजपाच्या एका आमदाराने मुंबईत ठाण मांडून गुन्हा दाखल होवू नये, यासाठी दबाव टाकल्याचा व त्याबाबतचे फोटो, पुरावेही देणार असल्याचे सातपुते यांनी म्हटले होते. माध्यमांमधून हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापौर पदाच्या उपकाराची जाणीव करुन दिली. तसेच सातपुतेंची पात्रता नसल्याचे सांगत रात्रीची उतरलेली नसल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बायफळ बडबड करतात, असा टोलाही त्यांनी लगावला होता. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्‍तव्यामुळे स्वपक्षातील सहकार्‍यांनीही सातपुतेंविरोधात नाराजी व्यक्‍त केल्याचे बोलले जाते.

स्थानिक नेतृत्वानेही याबाबत जाब विचारुन कानपिचक्या दिल्यानंतर सातपुतेंनी मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्‍तव्याबाबत घुमजाव केले आहे. पथदिवे घोटाळ्यात राष्ट्रवादीचा लाभार्थी असणारा ठेकेदार अडकल्यानंतर पाहुण्यांच्या मदतीला सदैव धावणारे एक आमदार मंत्रालयात 8 दिवस ठाण मांडून होते, त्यांनीच गुन्हा होवू नये, म्हणून दबाव टाकला, या विषयात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही, असे सातपुते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपासमोर शिवसेनेच्या वाघाची शेळी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेनेने दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान राष्ट्रवादीने स्वीकारले आहे. तारीख, वेळ जाहीर करण्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्यापही शिवसेनेने याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही.