Sun, Apr 21, 2019 05:52होमपेज › Ahamadnagar › मनपात बेमुदत काम बंद!

मनपात बेमुदत काम बंद!

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:47PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी बाळू भाकरे यास मारहाण झाल्यानंतर पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. भाकरे याने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भीतीपोटीच त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी करत जो पर्यंत भाकरे कुटुंबाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी यावेळी जाहीर केली.

मयत भाकरे याच्या मारहाणीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कर्मचारी युनियने काल (दि.4) दुपारी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे दुपानंतर महापालिका बंद करण्यात आली. यावेळी मनपात गेट सभा घेऊन लोखंडे यांनी भूमिका जाहीर केली. पाणीपुरवठा विभागात वॉलमन असलेल्या भाकरे यांना 29 एप्रिल रोजी मारहाण झाली. त्याबाबत त्याने तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर 30 एप्रिलला पुन्हा दमदाटी झाली. त्याचीही तक्रार त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. दुर्दैवाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन आरोपींना पाठिशी घातले. मनपा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. दोन वेळा तक्रारी दिल्यानंतर भाकरे यांना पुन्हा दमदाटी झाली. जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबातील सदस्यांना याबाबत सांगितले. भावाला फोन करुन ही घटना सांगितल्यानंतर भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचे लोखंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाकरे याची आत्महत्या नसून त्याचा एक प्रकारे खूनच झाला आहे. त्यामुळे त्याने तक्रार दिलेल्या आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करावा. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकरे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील. उद्या (दि.5) सकाळी पुन्हा गेट सभा घेऊन काम बंदच ठेवायचे का? याबाबत पुढील भूमिका जाहीर करु, असे लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, मनपा बंद केल्यामुळे कामकाज ठप्प झाले असून सवलतीच्या काळातील सुरु असलेली कर वसुलीही बंद झाली आहे.