Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Ahamadnagar › ‘हाता’ला हवी ‘घड्याळा’ची साथ..धनुष्य-कमळाची जुळणार का बात

‘हाता’ला हवी ‘घड्याळा’ची साथ..धनुष्य-कमळाची जुळणार का बात

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMगोरख शिंदे 

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं, प्रभागरचना जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांची धावपळ सुरू झालीय खरी. पण प्रमुख राजकीय पक्षांकडून अजूनही आपले पत्ते खोलण्यात न आल्यानं सध्यातरी कुठून कोण लढणार, एवढ्याच चर्चांना चौकांचौकांत उधाण आलेलं आहे. राजकीय पक्षांच्या अंतर्गत पातळीवरच त्याची गुप्त खलबतं रंगताना दिसत आहेत. प्रभागरचना जाहीर होण्यापूर्वी इकडून तिकडं उड्या मारण्यासाठी आयाराम-गयारामांची जोरदार तयारी सुरू होती. पण एकदाची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली अन् तिचं विस्तीर्ण रूप पाहून या आयाराम-गयारामांची चांगलीच कोंडी झाल्यानं, अनेकांनी आहे तिथंच थांबणं पसंत केलं. त्यामुळं त्यांच्या आगमनाच्या वाटेवर थांबलेल्या राजकीय पक्षांची घोर निराशा झाली अन् त्यांचे एकहाती सत्ता आणण्यासाठी दिलेले स्वबळाचे नारेही हळूहळू गळून पडताना दिसतायेत. एखाददुसरा प्रवेश होत असलातरी, त्यांनाही आता ‘एकमेका साह्य करू..अवघे धरू सुपंथ’ याची जाणीव होऊ लागल्याचं दिसतयं. तरीही उसणं आवसान आणून अधूनमधून त्यांच्या स्वबळाच्या नार्‍यांना पुन्हा घुमारे फुटतायेत. मात्र, तरीही वरिष्ठ पातळीवरून युतीसाठी ‘कमळा’कडून ‘धनुष्या’ला खुणावलं जाऊ लागलयं. पण इच्छुकांची झालेली भाऊगर्दी अन् कार्यकर्त्यांचा युती नकोच, असा सूर पाहून अजूनतरी त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत थंड असलेल्या राजकीय पक्षांमधील हालचाली आता हळूहळू वेग घेऊ लागल्याचं दिसू लागलंय. ‘तुझं माझं जमेना अन् तुज वाचुनी करमेना’, अशी आता त्यांची स्थिती झालीय. त्यामुळंच आता आघाडी अन् युतीच्या चर्चेला घुमारे फुटू लागल्याचं दिसतयं. शहरात नेतृत्वाअभावी हतबल असलेल्या ‘हाता’ला आता खंबीर मनगटाच्या ‘घड्याळा’ची साथ हवीय. तर दुसरीकडं शहर अन् उपनगरांतील राजकीय परिस्थिती, अन् भविष्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेता, एकट्याच्या बळावर मनपात सत्तेचं ‘धनुष्य’ पेलायचं की नगरसेवक अन् कार्यकर्त्यांची इच्छा पाहून ‘कमळा’शी जुळवून घ्यायचं की नाही, याची बातचित सुरू झालीयं. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसं आघाडी अन् युती होईल की नाही, याचं चित्र अधक स्पष्ट होत जाईल, हे नक्‍की. 

प्रभागरचना जाहीर झाल्यापासून प्रमुख राजकीय पक्षांकडून अंतर्गत पातळीवर निवडणुकीची व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक प्रभागाची रचना लक्षात घेऊन कुठून कोण उमेदवार द्यायचा, प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, याचे ठोकताळे आखण्याचे काम स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून सुरू होते. मात्र, आता राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरूनही या निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू झाल्यायेत. काँगे्रस अन् राष्ट्रवादी काँगे्रसने एकाच दिवशी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावे घेत, निवडणुकीत जोमानं उतरण्याची तयारी सुरू केलीय. पण शहरात नेतृत्वाअभावी बॅकफूटवर गेलेल्या काँगे्रसला राष्ट्रवादीच्या आधाराशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळं निवडणुकीत दोन्ही काँगे्रसची आघाडी व्हावी, असं काँगे्रसच्या नेत्यांना मनापासून वाटतंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काँगे्रसच्या मेळाव्यात तसं सूतोवाचही करताना आघाडी होण्यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचं आवर्जून सांगितलंय. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये आघाडीबाबत एकमत नसल्याचे पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी पक्षाच्या मेळाव्यातच स्पष्ट केलंय. आघाडीसाठी दोन्ही काँगे्रसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये आतापासूनच मनोमिलन होण्याची गरज विखे यांनी व्यक्‍त केलीय. तर लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचं दोन्ही काँगे्रसने ठरविलेलं असलं तरी, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय राष्ट्रवादीने स्थानिक पदाधिकार्‍यांवर सोपविलेला आहे. काँगे्रसशी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये मात्र एकमत नाही. त्यामुळं याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीनं पाचजणांची समिती स्थापन केलीय. या समितीकडून आघाडी करायची की नाही, याबाबत केली जाणारी शिफारस प्रदेशकडून मान्य केली जाणार आहे. तरीही राष्ट्रवादी आघाडीबाबत सकारात्मक असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलंय खरं. पण शहरात नेतृत्वाअभावी झालेली काँगे्रसची दयनीय अवस्था पाहता,‘हाता’ला ‘घड्याळाची’ साथ मिळेल का, असा प्रश्‍न आहे. अन् जरी साथ मिळाली तरी जागावाटपात राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणार, अन् तो या काँगे्रसला सहनच करावा लागणार, हे मात्र निश्‍चित.

दुसरीकडं स्वबळावर निवडणूक लढवून मनपावर भाजपाचा झेंडा फडकविण्याची राणा भीमदेवी थाटात घोषणा एका गटाकडून करण्यात आली खरी. सांगली अन् जळगाव महापालिका निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती नगरमध्ये करण्यासाठी तसं रणशिंगही फुंकण्यात आलं. पण या दोन्ही महापालिकांत निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षांतील इच्छुकांना पक्षात घेऊन, भाजपानं वापरलेला ‘फंडा’ या गटाला नगरमध्ये मात्र जमू शकलेला नाही. या पक्षात काही प्रवेश झाले खरे, पण प्रभागरचनेनं डोळे विस्फारलेल्या ‘आयारामां’नी  मात्र नंतर ‘पिछेमूड’ केल्यानं भाजपाची पंचाईत झाली. त्यामुळं अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार मिळण्यासाठी त्यांच्यावर शोधाशोध करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय भाजपाच्या या गटाचा शिवसेनेशी पहिल्यापासून छत्तीसचा आकडा. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधून विस्तवही जात नाही अन् एकमेकांवर टिकेची संधी कुणीही सोडत नाही. वरिष्ठ पातळीवर बैठक होऊनही भाजपातील गटबाजी संपणार नसल्याचे या पक्षाच्या मनपातील गटनेत्याने ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत केलेल्या प्रवेशावरून स्पष्ट झालेलं आहे. भाजपाच्या या गटाच्या स्वबळाच्या नार्‍यानंतर शिवसेनेनंही ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतलेली आहे. युती होऊनही भाजपाच्या या गटाकडून नेहमीच काँगे्रस-राष्ट्रवादीला पूरक भूमिका घेतली गेल्याचा अनुभव असल्याने ‘युती’ नकोच, असा शिवसेना कार्यकर्त्यांचा सूर आहे. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास भाजपाच्या कमी होणार्‍या मतांचाही विचार करावा लागेल, याची जाणीव नगरसेवकांनी बैठकीत करून देतानाच युतीबाबत सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जावा, असं मत व्यक्‍त केलंय. नव्या प्रभागरचनेत मध्यवर्ती शहरासह उपनगरांत शिवसेनेला पूरक परिस्थिती वाटत असलीतरी, अनेक ठिकाणी भाजपाचीही ताकद असल्याचे टाळून चालणार नाही. शिवाय दोन्ही काँगे्रसची आघाडी होणारच हे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळं एकीकडं शिवसेना कार्यकर्त्यांना नको असलेली युती, तर दुसरीकडं बेरजेचं राजकारण लक्षात घेऊन नगरसेवकांनी व्यक्‍त केलेली मतं पाहता, मनपा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार की नाही, दोन्ही पक्ष स्वबळावर आमनेसामने उभे ठाकणार का, याबाबत चर्चा होताना दिसत आहेत. अन् समजा युती झालीच तर मागच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या वादानंतर शेवटच्या टप्प्यात झालेला ‘पुरस्कृत’चा ‘खेळ’ पुन्हा ऐनवेळी तर रंगणार नाही ना, याकडं नगरकरांचं लक्ष लागून राहणार आहे.