Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Ahamadnagar › थकबाकीदारांवर मनपाचा बडगा!

थकबाकीदारांवर मनपाचा बडगा!

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:16PMनगर : प्रतिनिधी

शास्तीमध्ये सवलत देऊनही मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी न भरणार्‍यांवर सुरु असलेल्या कारवाई मोहिमेत आता नळजोड तोडण्यास सुरुवात झाली आहे. केडगाव उपकार्यालयांतर्गत काल (दि.22) 4 थकबाकीदारांना वॉरंट बजावण्यात आले. त्यातील तिघांनी थकबाकीचा भरणा केला. तर एकावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, माळीवाडा प्रभाग कार्यालयाने दोन तर सावेडी प्रभाग कार्यालयानेही काल एका गाळ्याला सील ठोकले.

11 जून पर्यंत मनपाने मालमत्ता करावरील शास्तीत सवलत जाहीर केली होती. या काळात तब्बल 40 कोटींची वसुली झाली. यात थकबाकीदारांनी केवळ 18 ते 20 कोटीच जमा केले आहेत. अनेक थकबाकीदार सवलती देवूनही कर भरण्यास नकार देत असल्याने मनपाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने गेल्या आठवडाभरात चार ते पाच थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. तर काहींचे नळ कनेक्शन तोडले आहे. केडगावात काल सुर्यकांत जाधव यांचे नळकनेक्शन 1.27 लाखाच्या थकबाकीपोटी तोडण्यात आले.

सावेडी प्रभाग कार्यालयानेही जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. काल केदारे यांच्या मालकीचा व भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटी वापरत असलेला वेदांतनगर येथील गाळा सील करण्यात आला आहे. त्यांच्याकडे 5.20 लाखांची थकबाकी आहे. माळीवाडा प्रभाग कार्यालयाने काल पहिलीच कारवाई करत नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्समधील विलास लोढा यांचे दोन गाळे सील केले. त्यांच्याकडे एकूण 2.12 लाखांची थकबाकी आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपायुक्‍त प्रदीप पठारे यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रभाग अधिकार्‍यांशी चर्चा करुन कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, अंबादास सोनवणे, जितेंद्र सारसर आदींनी कारवाईला सुरुवात केली आहे. झेंडीगेट प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत मात्र अद्यापही शांतताच आहे.