Sun, Oct 20, 2019 02:36होमपेज › Ahamadnagar › नगर शहरातील २७ हजार भूखंड मनपाच्या रडारवर!

नगर शहरातील २७ हजार भूखंड मनपाच्या रडारवर!

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 10 2018 11:52PMनगर : प्रतिनिधी

मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी येत्या काळात तब्बल 27 हजार मोकळ्या भूखंडांवर कारवाई सुरु करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. थकबाकी असलेल्या मोकळ्या भूखंडांच्या यादीसह त्याचे जप्ती वॉरंट प्रसिध्द करण्यात येणार असून, 21 दिवसांत थकबाकी न भरल्यास या मालमत्तांची जप्ती करुन लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपायुक्‍त ज्योती कावरे यांनी शुक्रवारी (दि.10) पत्रकारांशी बोलतांना दिली.

उपायुक्‍त कावरे म्हणाल्या की, मालमत्ता कराच्या वसुलीसंदर्भात प्रत्येक प्रभाग समितीनिहाय लिपिकांकडून आढावा घेतला जात आहे. यात अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडावरील थकबाकीचा प्रश्‍न समोर आला आहे. शहरात सुमारे 27 हजार भूखंड धारकांकडे सुमारे 8.50 कोटींची थकबाकी आहे. भूखंडांचे मालक, त्यांचे पत्ते मिळत नसल्याने जप्तीच्या नोटीसा बजावण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मनपाकडे असलेली मालकाची नोंद व सातबारा उतार्‍यावरील माललकाच्या नावाची नोंद करुन या दोघांच्याही नावे जप्ती वॉरंट काढण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रभाग समितीनिहाय यादी तयार करुन वर्तमानपत्रातून अथवा मनपाच्या संकेतस्थळावर त्यांच्या नावे जप्ती वॉरंट बजावण्यात येणार आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी त्यांना 21 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. मुदतीत कराचा भरणा न केल्यास महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. लिलावाला प्रतिसाद न केल्यास या मालमत्ता महापालिकेच्या नावावर केल्या जाणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी ही कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, मनपाने चालू आर्थिक वर्षात 50 कोटींची वसुली केली आहे. पहिल्या सहा महिन्यात सप्टेंबर अखेर 70 टक्के वसुलीचे उद्दिष्ट प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आढावा घेवून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन केले जात आहे. अनेक वर्षे यातून मार्ग न काढल्यामुळे थकबाकी वाढत गेली आहे. त्यामुळे येत्या अडचणीतून मार्ग काढून वसुली वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

2018 अखेर ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे, अशा सर्वच मालमत्ताधारकांना यापुढे जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येणार आहेत. याबाबतची कार्यवाही 100 टक्के पूर्ण होण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे. तशा सूचना वसुली लिपिक व प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत वसुलीत वाढ होण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असून, या माध्यमातून महापालिकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असल्याचे उपायुक्‍त कावरे यांनी यावेळी सांगितले.