Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Ahamadnagar › महापालिकेचा उद्यान घोटाळा विधिमंडळात!

महापालिकेचा उद्यान घोटाळा विधिमंडळात!

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 04 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या जेसीबी वापराच्या कामाची व बुके खरेदीची तब्बल 55.50 लाखांची किरकोळ रकमांची बिले प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. या प्रकरणी ‘पुढारी’ने वृत्त प्रसारित केल्यानंतर आ. विजय औटी यांनी तारांकीत प्रश्‍नाद्वारे या घोटाळ्याकडे विधिमंडळाचे लक्ष वेधले आहे. मनपा प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत, उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. शहरातील मोकळ्या भूखंडाची साफसफाई करणे, झाडे लावणे, खड्डे घेणे आदी कामांसाठी जेसीबी भाडेतत्त्वावर घेतला होता. 

त्याच्या भाड्यापोटी सरासरी 70 तासांची देयके तयार करण्यात आली आहेत. तसेच गवत काढण्याच्या कामांचीही देयके तयार करण्यात आली असून, तब्बल 47.50 लाखांची ही कामे असल्याचे पुढे आले आहे. या सर्व कामांचे प्रस्ताव विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकारात मंजूर व्हावेत, यासाठी किरकोळ बिले तयार केली आहेत. मुख्य लेखापरीक्षकांकडे यातील 22.47 लाखांची देयके मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर, त्यांनी यावर आक्षेप घेतला होता. ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तत्कालीन आयुक्‍तांनी याची गंभीर दखल घेत, उद्यान विभागप्रमुखांना नोटीस बजावली होती. तसेच या सर्व बिलांची चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. 

दरम्यानच्या काळात आ. औटी यांनी विधिमंडळात तारांकीत प्रश्‍न उपस्थित केल्याने शासनाने याबाबत महापालिकेकडून माहिती मागविली आहे. त्यानंतर झोप उडालेल्या प्रशासनाने उद्यान विभाग प्रमुखांकडून मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत, त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश बजावले आहेत. मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांची चौकशी अधिकारी म्हणून तर प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांनी सादरकर्ता अधिकारी म्हणून यात नियुक्‍ती करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण करुन अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे आदेश उपायुक्‍त प्रदीप पठारे यांनी दिले आहेत.

पळविलेल्या फायली पुन्हा मनपात!

उद्यान विभागातील प्रशासकीय मान्यता नसलेल्या किरकोळ बिलांबाबत ‘पुढारी’ने वृत्त प्रसारित केल्यानंतर, यातील बहुतांशी फायली ठेकेदारांनी पळविल्या होत्या. खुद्द उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांनीच याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर पळविलेल्या फायलींपैकी काही फायली पुन्हा मनपात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.