Thu, Nov 22, 2018 16:08



होमपेज › Ahamadnagar › उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:05AM



नगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महापालिका कर्मचारी युनियन व मराठा सेवा संघ मनपा शाखेने तीव्र निषेध केला आहे. मनपासमोर पुतळा जाळण्यात आल्यानंतर कर्मचारी अशोक बिडवे याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्यादही दिली आहे. तसेच जोपर्यंत छिंदम यांना अटक होत नाही, तो पर्यंत मनपाचे कामकाज बंदच राहील, असा पवित्रा कर्मचारी युनियने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

उपमहापौर छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे याला कर्मचारी मिळण्यासाठी फोनवरुन दमदाटी केली. शिवजयंतीनंतर कर्मचारी देतो, असे सांगितल्यावर शिवजयंती व शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन अपशब्द वापरले. संबंधित कर्मचार्‍याने युनियनचे अध्यक्ष लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांना घटनेची माहिती दिल्यानंतर कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेत गेट सभा घेवून घटनेचा निषेध केला.

छिंदम यांना नगरसेवक पदासाठी अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, भाजपाने व खा. दिलीप गांधी यांनी सर्व शिवप्रेमी जनतेची जाहीर माफी मागावी, छिंदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी युनियनकडून करण्यात आली. तसेच कर्मचारी बिडवे याने तोफखाना पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दुपारी मनपातील मराठा सेवा संघाच्या शाखेच्या वतीने तसेच कर्मचारी युनियनच्या वतीने मनपा कार्यालयासमोर छिंदम यांचा पुतळा जाळण्यात आला. जोपर्यंत छिंदम यांना अटक होत नाही, तोपर्यंत मनपाचे काम बंदच राहील, छिंदम यांना यापुढे महापालिकेत पाऊल ठेवू देणार नाही, असा पवित्रा कर्मचारी युनियनने घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!