Tue, Mar 26, 2019 20:27होमपेज › Ahamadnagar › बससेवेतील 5 गाड्यांवर कारवाई

बससेवेतील 5 गाड्यांवर कारवाई

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:11AMनगर  :प्रतिनिधी

‘यशवंत अ‍ॅटो’मार्फत शहरात पुरविल्या जाणार्‍या महापालिकेच्या शहर बससेवेतील दुरवस्था झालेल्या 5 गाड्यांवर काल (दि.19) उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गाड्यांची कागदपत्रे, फिटनेस, परमिट तपासल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, ‘आरटीओं’च्या कारवाईनंतर व बससेवेबाबत सुरु असलेल्या राजकारणामुळे अभिकर्ता संस्थेने आजपासून (दि.20) शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसही त्यांनी कालच मनपाला बजावली आहे.

शहर बससेवेतील वाहनांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी झाल्या होत्या. मनपाने नुकसान भरपाई थकविल्यानंतर अभिकर्ता संस्थेने सेवा बंद केली होती. दोन दिवसानंतर ही सेवा सुरु झाल्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, गिरीश जाधव, नितीन भुतारे, परेश पुरोहीत यांनी मनपा आयुक्‍त व आरटीओ कार्यालयाला निवेदन देऊन दुरवस्था झालेल्या बसेस सेवेतून हटविण्याची मागणी केली होती. ‘आरटीओ’ला पत्र देवून कारवाईची मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनीच नादुरुस्त ‘एएमटी’तून निघत असलेल्या धुराचे लोट व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक विक्रम राठोड यांनी याबाबत आरटीओ कार्यालयाला पत्र देवून तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

काल सकाळीच राठोड यांनी पुन्हा आरटीओ पाटील यांची भेट घेवून कारवाईबाबत जाब विचारला. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट, शिवज्योती भामरे, योगिता मगर या अधिकार्‍यांच्या पथकाने सावेडी, एमआयडीसी, माळीवाडा, दिल्लीगेट आदी भागांत 5 बसेस अडवून त्याची तपासणी केली. युवासेनेसह मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही यावेळी हजेरी लावून गाड्या जप्‍त करण्याची मागणी केली. त्यानंतर एक गाडी आरटीओ कार्यालयात तर उर्वरीत बस डेपोत नेण्यात आल्या. कागदपत्रे, परमिट व फिटनेस तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

बससेवेत वापरल्या जाणार्‍या बहुतांशी गाड्यांची पुरती दुरवस्था झाल्याचे खुद्द त्यांच्या कर्मचार्‍यांनीच कबूल केले आहे. सावेडी नाक्यावर पकडलेल्या बसचा ‘क्‍लच’ नादुरुस्त होता. अ‍ॅक्सिलेटर ऐवजी क्‍लच दाबल्यावरही गाडी पळते, अशी धक्कादायक बाबही तपासणीवेळी कर्मचार्‍याने पुढे आणली. कारवाईनंतर मनसेच्या वतीने आरटीओ दीपक पाटील यांच्यासह कारवाई करणार्‍या पथकातील अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, आरटीओच्या कारवाईनंतर अभिकर्ता संस्था यशवंत अ‍ॅटोने शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसही त्यांनी मनपाला बजावली असल्याचे संचालक धनंजय गाडे यांनी सांगितले.