होमपेज › Ahamadnagar › मनपाचा अर्थसंकल्प आज सादर होणार!

मनपाचा अर्थसंकल्प आज सादर होणार!

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 11:06PMनगर : प्रतिनिधी

आर्थिक ‘दिवाळखोरी’च्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या महापालिकेचा 15 वा अर्थसंकल्प प्रशासनाकडून आज (दि.19) स्थायी समितीकडे सादर केला जाणार आहे. ठप्प असलेली वसुली, उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत व ढिसाळ नियोजनामुळे वाढलेली दायित्वे याबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना व पुढील आर्थिक वर्षाबाबत केलेल्या नियोजनाकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या आजवरच्या अर्थसंकल्पात नगरकरांना अनेक ‘स्वप्ने’ दाखविण्यात आली. मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यासाठी आयपत नसतांनाही भरमसाठ तरतुदी करण्यात आल्या. प्रशासनाकडून अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेले उत्पन्न प्रत्यक्षात कधी दिसलेच नाही. परिणामी, महापालिकेवर कोट्यवधींच्या दायित्वांचा बोजा पडला आहे. महावितरणची 150 कोटींची थकबाकी, ठेकेदार-पुरवठादारांचे थकलेले 35 कोटी, कर्मचार्‍यांची 60 ते 70 कोटींची थकीत देयके अशी कोट्यवधींची देणी महापालिकेला आहेत. तर दुसरीकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी 200 कोटींवर गेली आहे. ‘घरपट्टी’त 2005 नंतर आजतागायत वाढ झालेली नाही. पाणीपट्टीही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पन्नापेक्षा तीनपट खर्च अशी मनपाची अवस्था आहे. कोट्यवधींचे आकडे फुगवून आणि बजेटमध्ये शासनाकडून योजनांद्वारे मिळणारा निधी दाखवून 500 कोटींवर बजेट नेले जाते. प्रत्यक्षात मनपाच्या या अर्थसंकल्पाचा आणि वर्षभरात होणार्‍या जमा-खर्चाचा ताळमेळ कधीच जुळला नाही.

गेल्या काही वर्षांपासून सर्वच आयुक्‍तांनी ‘वास्तव’ बजेट मांडल्याचे दावे केले आहेत. आज सादर होणार्‍या अर्थसंकल्पातही ‘वास्तव’ मांडण्याचा प्रयत्न केल्याचेच प्रशासनाकडून सांगितले जाणार आहे. त्यामुळे दायित्वे आणि पुढील वर्षाच्या आर्थिक नियोजनबाबत यंदा काही ठोस उपाययोजना करण्यात आल्यात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.