Sun, Mar 24, 2019 22:59
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मनपा उपायुक्‍तांच्या अंगावर फेकले पैसे!

मनपा उपायुक्‍तांच्या अंगावर फेकले पैसे!

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 10:41PMनगर : प्रतिनिधी

ड्रेनेज लाईनच्या कामाच्या देयक प्रस्तावावर सह्या रखडल्यामुळे ठेकेदार शाकीर शेख व मनपा अधिकार्‍यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. वाद सुरु असतांनाच संतप्त ठेकेदाराने उपायुक्‍त दिगंबर कोंडा यांच्या अंगावर पैसे फेकल्याचा प्रकार घडल्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल (दि.21) सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, वरीष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर द्विवेदी यांनी ठेकेदावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्‍त कोंडा यांना दिले आहेत.

पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यापासून कामे तपासल्याशिवाय अधिकारी सह्या करत नाहीत. अधिकार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक फायली प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणात लटकली आहेत. रामचंद्र खुंटावरील ड्रेनेज लाईनच्या कामाचे अंतिम देयकही तपासणीअभावी रखडले होते. शहर अभियंत्यांसह इतर अधिकार्‍यांनी सह्या केल्यानंतर हे देयक कोंडा यांच्याकडे मंजुरीसाठी आले. कोंडा यांनी काम तपासल्याशिवाय सही करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठेकेदार शेख याने बांधकाम विभागात जावून शहर अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला. आत्ताच कामाची तपासणी करायला चला, अशी मागणी करत त्याने ठिय्या दिला.

अधिकार्‍यांनी दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या शेख याने मनपाचे अधिकारी पैशांसाठी लायली अडवून ठेवत असल्याचा आरोप केला. तेथून ते उपायुक्‍तांच्या दालनात गेले. कोंडा साहेब तुम्ही पैसे घ्या पण फाईलवर सही करा, अशी मागणी करत त्याने कोंडा यांच्या अंगावर पैसे फेकले. कुणीही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय सह्याच करत नाही, असा आरोप त्याने पुन्हा केला. यावेळी कोंडा यांनी खोटे आरोप करु नका असे बजावले. यावेळी दोघांची हमरीतुमरीही झाली.

या घटनेनंतर बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी काम बंद करुन ते जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे गेले. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, कोंडा यांच्यासह सर्व अधिकार्‍यांनी घडलेला प्रकार जिल्हाधिकार्‍यांना सांगितला. त्यानंतर संबंधित ठेकेदारावर शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न करणे, अधिकार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी फिर्याद देवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी उपायुक्‍त कोंडा यांना दिले. त्यानुसार उपायुक्‍त कोंडा व अधिकार्‍यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात  जावून तक्रार दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.