Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Ahamadnagar › पालिका ‘ठेक्या’ तून घर भरण्याचे काम

पालिका ‘ठेक्या’ तून घर भरण्याचे काम

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 24 2018 12:13AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

मागील तीन महिन्यांपासून पालिकेची सभा न घेण्यात आल्याच्या मुद्यावरून गदारोळात सुरू झालेली पालिकेची सभा शेवटपर्यंत गोंधळातच पार पडली. सभे दरम्यानच अजेंड्यावर असलेले विषय न घेता बराच वेळ काही सदस्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने नगरसेवक बाळासाहेब गांगड यांनी सभेतच पाण्याची बाटली व विषयपत्रिका फेकून देत अंजूम शेख गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. दरम्यान, या सभेत विरोधी नगरसेवकांनी शेवटपर्यंत स्वच्छता प्रश्‍नासह ठेक्याचा मुद्दा लावून धरत पालिकेकडून ठेकेदाराचे घर भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करीत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

काल नगरपरिषदेची मासिक सर्वसाधारण सभा पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी सुमंत मोरे, उपनगराध्यक्ष करण ससाणे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच सभेपुढील विषयांऐवजी ठेका, स्वच्छता, प्रेक्षक गॅलरी या मुद्यांचा आधार घेत विरोधकांनी सभेत प्रश्‍नांचा भडिमार केला. पालिकेच्या सभेबाबत कुठलीही गुप्तता नसल्याने पालिकेचा कारभार जनतेसमोर आला पाहिजे,

यासाठी सभागृहाची बंद असलेली प्रेक्षक गॅलरी खुली करण्यात यावी, अशी मागणी संजय फंड, मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, भारती कांबळे यांनी करीत गॅलरी उघडी केल्याशिवाय सभा सुरू न करण्याच्या निर्णयावर येवून ठेपले. त्यावर नगराध्यक्षा आदिक यांनी पुढील सभेपासून गॅलरी उघडी ठेवण्यात येईल, असे सांगितले.  पालिकेच्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा चोरी प्रकरणाबाबत नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मुद्दा उपस्थित केला.

यात एक नगरसेवक असून संबंधितांवर अद्यापर्यंत कारवाई न झाल्याचे मुख्याधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले असता, संतप्त झालेल्या मुख्याधिकार्‍यांनी मी आता पोलिसांचे काम करावे की काय? असा सवाल उपस्थित केला. याच प्रश्‍नावरून श्रीनिवास बिहाणी, संजय फंड, मुक्तार शहा यांनी ढोकणे यांना चिंचा चोरणार्‍या नगरसेवकाचे नाव सभेत जाहीर करावे, तरच सभेचे कामकाज पुढे जाईल, असा निर्णय घेतल्याने सभेत बराच वेळ गोंधळ उडाला.

चालू वर्षी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त लावण्यात येणार्‍या रहाट पाळण्याचा ठेका 25 लाख रुपयांना म्हणजे मागील वर्षीपेक्षा सुमारे 11 लाख 52 हजार रुपयांनी जास्त गेला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून नागरिकांची वाढीव पैसे घेऊन लुट होऊ शकते, असे मत मुजफ्फर शेख यांनी मांडले. त्यावर अनुराधा आदिक यांनी आपला हेतू पालिकेच्या फायद्याचा असून यावर पालिकेचे पूर्णपणे नियंत्रण असल्याचे स्पष्ट केले. रहाट पाळण्याच्या ठिकाणी पालिकेकडून रहाट पाळण्याच्या दराबाबत फलक लावण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

निर्मल भारत स्वच्छता अभियान अंतर्गत 58 हजार रुपयांचा ठेका  1 लाख 9 हजार 803 रुपयांना देऊन यामध्ये सुमारे 50 हजारांची वाढ करण्यात आल्याचे नगरसेवक दीपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून देत ठेकेदाराचे घर भरण्याचे काम सुरू असल्याचे सभेत जाहीर केले. एल.ई.डी. बाबत पालिकेने पाठपुरावा न केल्यामुळे 2016 मध्ये 98 लाख रुपयांचा निधी परत गेल्याचे श्रीनिवास बिहाणी यांनी निदर्शनास आणून दिले.

राममंदिराचा फलक लावण्यासाठी पालिकेकडून 600 रुपयांची पावती फाडण्यात आली. तसेच मागील वर्षी मंदिराचा कळस धुण्यासाठी फायर फायटर दिला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. पालिकेच्या कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी 97 हजार रुपयांचे नवीन सॉप्टवेअर खरेदी करण्याचा विषय उपस्थित झाला असता, त्याची किंमत 60 ते 65 हजार असल्याचे सांगत याबाबत चौकशी करूनच सॉप्टवेअर खरेदी करण्याची सूचना श्रीनिवास बिहाणी यांनी मांडली. एकंदरीतच जॉगिंग ट्रॅक, रमाई आवास योजनेतून उभारण्यात येणारी घरकुल योजना, शौचालय दुरुस्तीबाबत ठेका, शहरातील अस्वच्छता, वाढीव ठेक्याचा मुद्या यासह विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करत आरोप-प्रत्यारोपांतच सभा पार पडली. 
 

 

tags : Municipal,Council,news, Municipal,Contracts, Money, loot, issue in Shrirampur