Thu, Mar 21, 2019 16:07होमपेज › Ahamadnagar › ‘नंदनवन लॉन’वर महापालिकेचा हातोडा!

‘नंदनवन लॉन’वर महापालिकेचा हातोडा!

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 10:42PMनगर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून सुरु असलेल्या ‘मिशन सीना’ मोहिमेंतर्गत काल (दि.7) नदी पात्रातील पक्क्या अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. ‘नंदनवन लॉन’वर कारवाईला प्रारंभ होताच जाधव परिवाराने न्यायालयात धाव घेऊन कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयात आज (दि.8) सुनावणी होणार असून तोपर्यंत ‘जैसे थे’चे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई थांबविण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

शहर स्थापनादिनाचा मुहूर्त साधून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सीना पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या 12 दिवसांत हजारो ब्रास भराव पात्रातून काढण्यात आला आहे. पात्रातील शेतीची अतिक्रमणेही हटविण्यात आली आहे. कारवाई सुरु करण्यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर नोटिसीद्वारे पात्रातील व गाळपेर जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले होते.

त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे कालपासून पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई सुरु करण्यात आली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सकाळी पात्रात सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर पक्क्या अतिक्रमणांकडे ‘मोर्चा’ वळविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख इथापे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ‘नंदनवन लॉन’वर कारवाई सुरु करण्यात आली.

भूमिअभिलेख विभागाने केलेल्या मोजणीनंतर हद्दनिश्‍चित करुन खांब (निषाणी) रोवण्यात आला आहे. त्यानुसार नंदनवन लॉनने नदी पात्रात 15 ते 20 फुटांपर्यंत अतिक्रमण करुन सुमारे 10 ते 12 हजार चौरस फूट जागा व्यापल्याची नोंद करण्यात आली आहे. मनपाच्या पथकाने लॉनच्या मागील भागांत सीना पात्राच्या बाजूने कारवाईला प्रारंभ केला. मात्र, कारवाई सुरु होण्यापूर्वीच जाधव परिवाराच्या वतीने न्यायालयात ‘स्थगिती’साठी अज दाखल करण्यात आला होता. कारवाई सुरु असतांनाच न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याचा दावा करत जाधव परिवाराने कारवाई थांबविण्याची मागणी केली. इथापे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता आदेशाची प्रत मिळाल्याशिवाय कारवाई थांबवू नका, असे सांगितले. त्यामुळे कारवाई सुरुच ठेवण्यात आली. मनपाच्या विधिज्ञांकडून इथापे यांना आदेशाबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कारवाई थांबविली. मात्र, न्यायालयात सुनावणी होऊन आदेश येईपर्यंत लॉनमधील पत्र्याचे कंपाऊंड व स्टेज कारवाई करुन तोडण्यात आले होते.