Tue, Jul 16, 2019 21:58होमपेज › Ahamadnagar › उपमहापौरपदाचा आज फैसला

उपमहापौरपदाचा आज फैसला

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 11:34PMनगर  : प्रतिनिधी

महापालिकेच्या आज (दि.5) होत असलेल्या विशेष सभेत उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे. भाजपच्या माघारीनंतर शिवसेनेने अनिल बोरुडे यांना रिंगणात उतरवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला आव्हान दिले आहे. बंडखोर गटासह मनसे व शिवसेनेच्या दीपाली बारस्कर यांच्याकडून उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेकडून बहुमताचा दावा केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेला साथ द्यायची की तटस्थ रहायचे? याबाबत काल (दि.4) रात्री उशिरापर्यंत भाजप नगरसेवकांची बैठक सुरु होती. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून बोरुडेंसह बारस्कर यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे.

मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याने त्या अर्ज मागे घेतील असे सेनेकडून सांगितले जात आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’तून बाहेर पडलेल्या व शिवसेनेला साथ देणार्‍या बंडखोर गटानेही यावेळी शिवसेनेला आव्हान दिले आहे. समन खान व मुदस्सर शेख यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना पदाधिकार्‍यांनी मागील दोन-तीन दिवसांत त्यांच्याशी चर्चा करुन मनधरणीचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी (दि.3) सायंकाळी उपनेते अनिल राठोड यांनीही या गटाच्या सदस्यांशी ‘ग्रॅण्ड’ चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मनसेनेही नमते घेतल्याची चर्चा आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या गोटात मात्र उपमहापौर पदासाठी फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे.

आरिफ शेख व विपुल शेटीया यांचे अर्ज दाखल करून त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले असले तरी बंडखोर गट शिवसेनेबरोबर राहण्याची शक्यता असल्याने ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवारी कायम ठेवणार का? असा सवाल आहे.  दुसरीकडे निवडणुकीत माघार घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने तटस्थ राहणार की शिवसेनेबरोचर जाणार, हे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. काल सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु होती. आगरकर गटाचे सदस्य पूर्वीपासूनच शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून मात्र बहुमताचा दावा केला जात आहे.