Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Ahamadnagar › प्रभारी आयुक्‍तांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला!

प्रभारी आयुक्‍तांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला!

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 10:44PMनगर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी काल (दि.7) सावेडी प्रभाग कार्यालयासह मनपाच्या इतर कार्यालयांमध्ये अचानक भेटी देत कर्मचार्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले. ओळखपत्र नाही, गणवेश नाही, वसुलीचे घटलेले प्रमाण, अस्वच्छता आदी मुद्द्यांवर अधिकारी, कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. प्रभाग कार्यालयातील ओळखपत्र नसलेल्या व कार्यालयीन शिस्त धाब्यावर बसविणार्‍या एका कर्मचार्‍याबाबत जागेवरच निर्णय घेऊन त्याचे तडकाफडकी निलंबनाचे आदेशही द्विवेदी यांनी बजावले. आयुक्‍तांच्या धडक कारवाईमुळे कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आयुक्‍त द्विवेदी यांनी सावेडी प्रभाग कार्यालयात हजेरी लावली. कर्मचार्‍यांच्या कामकाजाबाबत माहिती घेत त्यांनी कर्मचार्‍यांची ओळख परेड घेतली. गैरहजर असलेल्या दोन कर्मचार्‍यांना नोटीसा बजावून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर कार्यालयात ‘टी शर्ट’ घालून काम करणार्‍या करण डापसे या कर्मचार्‍याकडे ओळखपत्र बरोबर नसल्यामुळे त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. कार्यालयात ज्यांना गणवेश ठरवून दिले आहेत, त्यांनी गणवेश घातलेच पाहिजेत. इतरांनीही नेटनेटके कपडे परिधान करुन कार्यालयीन शिस्तीतच काम करावे, असेही त्यांनी बजावले. वसुलीबाबत वरीष्ठांना माहिती देतांना उद्दामपणाची वर्तवणूक केल्यामुळे आयुक्‍तांनी या कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन केले. तात्काळ आदेश तयार करुन त्याच्यावर शिक्कामोर्तबही केले. 

प्रभाग कार्यालयानंतर द्विवेदी यांनी त्याच संकुलातील स्वच्छता गृहाची पाहणी केली. तेथील अस्वच्छतेबाबत जाब विचारुन स्वच्छता ठेवण्याची तंबी दिली. त्यानंतर द्विवेदी यांनी समोरच असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राची पाहणी केली. केंद्राची भव्य इमारत असतांनाही त्याचा पुरेपूर वापर होत नाही. 60 विद्यार्थ्यांच्या बॅचसाठी एवढी मोठी इमारत कशाला? असा जाब विचारत या ठिकाणी सावेडी प्रभाग कार्यालयात हलवायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलात असलेल्या मनपाच्या सावेडी आरोग्य केंद्राचीही तपासणी द्विवेदी यांनी केली. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही स्वच्छता निरिक्षकांना ओळखपत्र नसल्यामुळे सुनावत हजेरी पत्रकाची तपासणी केली. तसेच आरोग्य विभागाच्या समोरच असलेल्या ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे अधिकार्‍यांना धारेवर धरले. यावेळी वॉर्ड निरीक्षक नालेसफाईच्या कामावर नियंत्रण ठेवत असल्याचे सांगण्यात आल्यावर त्यांनी थेट काम सुरु असलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली. नाल्यातून काढलेला गाळ व कचर्‍याचे ढिग पाहून द्विवेदी यांनी नाराजी व्यक्‍त केली. जवळच असलेल्या भाग्योदय कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रमुखांना फोन करुन त्यांचीही खरडपट्टी काढली. तेथून त्यांनी झेंडीगेट कार्यालयातही भेट दिल्याचे सांगण्यात आले.

आयुक्‍त द्विवेदी यांनी सुरु केलेल्या सरप्राईज व्हिजीटमुळे तसेच एका कर्मचार्‍यावर तात्काळ कारवाईचा बडगा उगारल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या भीतीमुळे आजपर्यंत कधीही ओळखपत्र न वापरणार्‍या कर्मचार्‍यांनीही ओळखपत्र बाळगण्यास सुरुवात केली आहे.