Mon, Aug 19, 2019 14:11होमपेज › Ahamadnagar › नगरच्या ‘गंगुबाई’ला मुंबईकरांची दाद!

नगरच्या ‘गंगुबाई’ला मुंबईकरांची दाद!

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 19 2018 1:33AMनगर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी बालकलाकार सर्वज्ञा अविनाश कराळे आणि राहुल सुराणा यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगास मुंबईकरांनी मनापासून दाद दिली. 

नाट्य परिषदेचेे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विक्रम गोखले, अमिताभ बच्चन, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्या मिमिक्रीने उपस्थितांना खळखळून हसविले. सर्वज्ञाला जेव्हा तुझं गाव कोणतं गं? असं विचारलं, तेव्हा तिने सांगितले ‘अहमदनगर’ तेव्हा अनेकांनी तू ’नगर’चं नाव मोठं करशील, अशा शब्दांत तिला आशिर्वाद दिला. प्रत्येक ‘पंचेस’ला रसिकांच्या टाळ्या घेत जवळपास 15 मिनिटे सभागृह सर्वज्ञाने दणाणून सोडले. 

नाट्य संमेलनाच्या मंचावर मान्यवरांकडून झालेलं कौतुक, सर्वोत्कृष्ट सादकरीणाबद्दल नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव,  ‘चला हवा येऊ द्या फेम’ अभिनेते भारत गणेशपुरे, शाहिरी गायक नंदेश उमप यांनी दिलेली शाबासकी, अनेकांनी ‘सर्वज्ञा’सोबत काढलेला सेल्फी निश्‍चितच नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद होते. 

सर्वज्ञा अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचे ही शिक्षण घेत आहे. सर्वज्ञा आणि राहुल यांनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमधून प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली आहेत. या दोघांनाही मुंबईच्या रंगमंचावर सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष तथा मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी मोलाची भूमिका बजावली.