Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Ahamadnagar › मुळा’च्या विषारी मासेमारीची मुंबईत दखल

मुळा’च्या विषारी मासेमारीची मुंबईत दखल

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:25AMराहुरी : प्रतिनिधी

मुळा धरणात विषारी औषधाचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचा भांडाफोड ‘पुढारी’ने 30 एप्रिलच्या अंकात केल्यानंतर मंत्रालयातून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत तात्काळ कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुळा धरणाचा ठेका मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिज कंपनीने घेतल्यानंतर धरणात लाखो रुपयांचे कोळंबी मासे सोडण्यात आले आहेत. धरणात वाम, कथला, रावस, खौल, चिलापी, आमळी आदी माशांसह झिंगा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असताना ठेकेदार व अवैध मत्स्यमारी करणार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला. ठेकेदार कंपनीने मासेमारी करणार्‍यांना रितसर परवाने देत नियमानुसार मासेमारी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ठेकेदारांकडून परवाना न घेता अवैध मासेमारी करणार्‍यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचे कृत्य मुळा धरण परिसरात सुरू केले. जिलेटिन स्फोट व विषारी औषध धरणात टाकून कोळंबी व लहान माशांसह झिंगा मारण्यासाठी विषाचा वापर मुळा धरण भागात सुरू झाला. लाखो लोकांना पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणातील पाण्यात विष टाकून लाखो जीवांशी खेळले जात असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच पोलिस व पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले. दरम्यान, ठेकेदारांनी मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकताना पाचजणांना रंगेहाथ पकडले.

त्यापैकी तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, ठेकेदारांनी अवैध मासेमारी करणार्‍यांना पकडून दिले, म्हणून 15 ते 20 जणांनी मुळा धरण परिसरात दाखल होत ठेकेदारांच्या तीन कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला चढविला. याप्रमाणे मुळा धरण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांची दहशत कायम असून शासकीय अधिकार्‍यांसह ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांवर हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पाटबंधारे विभाग व ठेकेदारांशी संपर्क साधत घटनांबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुळा धरण भागात काही लोकांनी पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घरे उभारलेले आहेत. अतिक्रमण करणार्‍या लोकांची परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. धरणाच्या तटाला राहून अवैध मासेमारीसाठी जिलेटिन स्फोट, विषारी औषधाचा वापर अतिक्रमण धारकांकडून केला जात असल्याचे समजले आहे. ठेकेदारांनी त्यास विरोध केल्यास कर्मचार्‍यांना मारहाण करून त्यांचे शेड उद्ध्वस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. ठेकेदार कंपनीने याबाबत पोलिस व पाटबंधारे विभागाकडे तक्रारही दाखल केली आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत पाटबंधारे विभाग पुढाकार घेत नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागाने अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण देऊन राहुरी पोलिसांकडे मुळा धरण परिसरात बंदोबस्ताची लेखी मागणी केल्याचे समजते.

‘पुढारी’च्या वृत्तानंतर तातडीने दखल घेतली : नादुले 

‘पुढारी’मध्ये 30 एप्रिल रोजी मुळा धरणात विषारी मासेमारी’ याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तात्काळ आपण पाटबंधारे विभागाला याबाबत विचारणा केली. तसेच त्याठिकाणी मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांना पाठवून पंचनामे करून घेतले आहेत. लवकरच मत्स्य विभाग, पाटबंधारे विभाग व पोलिस प्रशासन आणि ठेकेदारांची संयुुक्त बैठक घेऊन विषारी औषध वापरणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मत्स्य विभाग आयुक्त राजेंद्र नादुले यांनी दिली आहे.