होमपेज › Ahamadnagar › शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आंदोलन 

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आंदोलन 

Published On: Jun 01 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 11:23PMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांच्या मुलांसमवेत शिर्डी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना बालकमंदिराच्या वर्ग (एलकेजी) चे प्रवेश देण्यात यावे, या मागणीसाठी साईबाबा इंग्लिश मिडीयमच्या प्रवेशव्दारावर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांसमवेत ‘प्रवेशव्दार बंद’ आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशव्दारापाशी शिर्डीतील ग्रामस्थ, पालक, चिमुरड्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रवेशव्दार बंद आंदोलन छेडले होते. याप्रसंगी साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चैगुले, अविनाश कोते, अशोक कोते, नगरसेवक सचिन कोते, जमादार इनामदार आदींनी ठिय्या मांडला होता. याप्रसंगी प्रथमनगराध्यक्ष कोते म्हणाले की, साईबाबा संस्थान राज्यात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी निधी देत आहे. मात्र स्थानिक शाळांमध्ये वर्ग वाढ न करता शिर्डीतील मुले शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करून संस्थानच्या कर्मचार्‍यांना प्रथम प्राधान्य देऊन इतर केवळ 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहे. कर्मचार्‍यांना प्राधान्य असले पाहिजे. मात्र स्थानिक व परीसरातील विद्यार्थ्यांचाही विचार करणे गरजेचे आहे. 

अशाप्रकारचे काम हे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ करीत असतील तर त्यांना आम्ही शिर्डीत पाय ठेवू देणार नाही. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांचा नामोउल्लेख न करता ते म्हणाले की, साईबाबा संस्थान हे त्यांची जहागिरी नाही, ते पाहीजे तसे निर्णय घेतात. स्थानिक विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण सुविधा देऊन त्यासाठी संस्थानने वर्ग वाढ करून द्यावे. संस्थानच्या अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असतील तर त्यांनी त्याचा उपयोग करून वर्ग वाढीसाठी प्रयत्न करावेत असे मत कोते यांनी व्यक्त केले. 

विजयराव कोते म्हणाले, नॉलेजसिटी, ग्लोबलसिटीचे स्वप्न दाखविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण संस्थानने उपलब्ध करून द्यावे. हे केलेले आंदोलन वैयक्तीक स्वार्थासाठी नसून शिर्डीतील उज्जवल भविष्य घडविण्यासाठी आहे. या आंदोलनात बसलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतले तर हावरेंना शिर्डीत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, मंदीर सुरक्षा प्रमुख आनंद भोईटे यांनी आश्वासन देत सांगितले की, आंदोलनकर्त्यांच्या भावना वरीष्ठापर्यंत पोहचवून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती.