Thu, Jul 18, 2019 16:55होमपेज › Ahamadnagar › प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाली!

प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाली!

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचनेच्या कार्यक्रमासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात त्यांनी मनपा अधिकार्‍याशी चर्चाही केली आहे. मात्र, मनपात वरीष्ठ अधिकारीच उपलब्ध नसल्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणुकीच्या सहा महिने अगोदर प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु केला जातो. डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार असल्याने कोणत्याही क्षणी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी मनपा अधिकार्‍यांशी चर्चाही केली आहे. मनपात सध्या आयुक्‍त, उपायुक्‍त व सर्वच वरीष्ठ अधिकार्‍यांची पदे रिक्‍त असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाकडून कार्यक्रम घोषित करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरसेवकांमध्ये उत्सुकता!

जळगाव महापालिकेची निवडणूक ऑगस्ट 2018 मध्ये होणार आहे. त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित झाला असून आज (दि.24) अंतिम प्रभाग रचना होणार आहे. कालच (दि.23) आयोगाने जळगाव महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. जळगाव नंतर तीनच महिन्यात नगर महापालिकेची निवडणूक होणार असल्याने प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाकडे नगरसेवकांचे व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मनपा अधिकार्‍यांनाही प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची प्रतिक्षा आहे.

प्रभाग रचना वर्तुळाकार की झिकझॅक?

जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना केली जाते. यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचना होणार असून एका प्रभागात 4 सदस्य असणार आहेत. त्यानुसार शहरात 17 प्रभाग होणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत प्रभाग रचना उत्तरेकडून दक्षिणकडे व झिकझॅक पध्दतीने करण्यात आली होती. तर 2003 साली पहिल्या निवडणुकीत वर्तुळाकार होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग रचना जिलेबीसारखी वर्तुळाकार होणार की झिकझॅक प्रभाग रचना होणार याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे.