Tue, Apr 23, 2019 21:51होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात मोफत दूधवाटप करून आंदोलन

संगमनेरात मोफत दूधवाटप करून आंदोलन

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:52PMसंगमनेर : प्रतिनिधी

दूध आंदोलनमुळे तालुक्यातील सर्वच दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले असून तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भगतसिंग दूध संस्था व दूधबंद आंदोलन कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यलयाजवळ गोरगरिबांना मोफत दूध वाटप करुन अभिनव आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदविला.

राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी शंभर टक्के पाठिंबा देत आंदोलन यशस्वी केले.  अनेक ठिकाणी गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले. दरम्यान दूध बंद आंदोलन कृति-समितीच्यावतीने तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भगतसिंग दूध संस्थेच्या वतीने राहुल दिघे, अमोल दिघे, सतीश वाळुंज, बंडू गुंजाळ यांनी आणलेले चार ते पाच कॅन दूध तहसील कार्यालयासमोर लगतच्या झोडपट्टीतील गोरगरीब नागरिकांना वाटप करून आंदोलन करण्यात आले.
सरकार दुधाला जोपर्यंत 27 रुपये लिटरप्रमाणे भाव देत नाही तोपर्यंत आमचे  मोफत दूध वाटपाचे हे आंदोलन सुरूच  राहणार असल्याचा इशारा दूध बंद कृति-समितीचे शरद थोरात, संतोष रोहोम, रावसाहेब डुबे, दिपक वाळे, राहुल दिघे, अमर कतारी यांनी दिला. या आंदोलनात राजाभाऊ देशमुख, सदाशिव हासे, प्रशांत वामन, वसंत डुबे, बळासाहेब जोर्वेकर उपस्थित होते.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनात संगमनेर तालुका दूध संघ व एस. आर. थोरात दूध संघ यांच्यासह छोट्या मोठ्या दूध संघांनी सहभाग नोंदविला. तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्र बंद ठेवत मध्यरात्री पासून दूध संघाचा एकही टँकर बाहेर पाठविला नाही. तालुक्यातील संगमनेर तालुका  सहकारी (राजहंस) दूध संघ, एस. आर. थोरात दूध, श्रमिक दूध, प्रभात दूध, रंजन व किल्ले गगनगड दूध संघांनी पाठिंबा देत एकदिवशीय संपात सहभाग घेत तालुक्यातील आपल्या सर्व दूध डेअरी आणि दूध संकलन बंद ठेवला. 

आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर दोन ते चार दिवसांपूर्वी दुधाच्या पावडरला अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, शेतकर्‍यांनी केलेल्या हमीभावाचे पाच रुपये दूध उत्पादकांच्या खात्यात जमा व्हावे, ही आमची अपेक्षा असल्याचे संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी सांगितले. 

शासनाने दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. ती मागणी बरोबर असून एस. आर. थोरात दूध संघ हा दूधउत्पादकांच्या बरोबर असल्यामुळेच संघ एक दिवस बंद ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे एस. आर. थोरात दूध संघाचे अध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी सांगितले.