Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Ahamadnagar › महानगर भरतीविरोधात आंदोलन उभारा : अण्णा हजारे 

महानगर भरतीविरोधात आंदोलन उभारा : अण्णा हजारे 

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 11:14PMपारनेर : प्रतिनिधी 

महानगर बँक नोकरभरतीमधील गैरप्रकाराविरोधात सामूहिक आंदोलन करा. नगर जिल्हा बँक भरतीमध्ये अन्याय झालेल्या उमेदवारांप्रमाणे महानगरच्याही अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय मिळेल, असा विश्‍वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्‍त केला. 

नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. उदय शेळके अध्यक्ष असलेल्या महानगर बँकेतही जिल्हा बँकेप्रमाणेच नोकरभरती घोटाळा झाला असून, त्याविरोधात अन्याय झालेले विद्यार्थी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण आंधळे यांनी उमेदवारांच्या पालकांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. आंधळे यांनी महानगरच्या भरतीमध्ये कशा पद्धतीने गैरप्रकार झाले आहेत हे पुराव्यासह हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले. हजारे यांनी ही भरती निश्‍चितच स्थगित होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. जिल्हा बँकेच्या गैरप्रकाराबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो, महानगर बँकेत अन्याय झालेल्या उमेदवारांनीही अन्यायाविरोधात संघर्ष करावा, वेळ आली तर मुख्यमंत्र्यांशी बोलू. सहकारमंत्री, सहकार सचिवांपुढे या दोन्ही बाजू मांडा. वेळ पडली तर मीही तुमच्या आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही हजारे यांनी दिली. 

पाटील यांच्यापुढे लवकरच सुनावणी 

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाटील यांनी ठेवलेल्या सुनावणीत बँकेच्या कार्यकारी संचालकांना एकाही प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. योग्य उत्‍तरे न मिळाल्यास एकतर्फी निर्णय घोषित करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. पाटील हे परदेशातून परतले असून लवकरच ही सुनावणी होणार असल्याचे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी सांगितले.