Wed, Mar 27, 2019 06:47होमपेज › Ahamadnagar › दोघा शिवभक्‍तांवर काळाचा घाला

दोघा शिवभक्‍तांवर काळाचा घाला

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:12AMसंगमनेर : प्रतिनिधी

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाने झडप घातली. घारगावनजिकच्या एका ढाब्यासमोर झालेल्या भीषण अपघातात संगमनेरातील संतोष सातपुते व संतोष खरे या दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घारगाव पोलिसांना खबर देऊनही ते वेळेत दाखल न आल्याने अपघातानंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह बराचवेळ रस्त्यावर पडून होते, असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, रविवारी रात्री संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारे संतोष सातपुते (वय 29) व संतोष खरे (वय 38) हे दोघे मोटारसायकल (क्रं.एच.एच17/जे.4777) वरुन शिवनेरीकडे निघाले होते. घारगावपासून तीन किलोमीटर पुढे पुणे रस्त्यावरील एका ढाब्यावर जेवण उरकून या दोघांनी आपला पुढील प्रवास सुरू केला. त्याचवेळी नऊ मैल परिसरात असलेल्या हॉटेल बिकानेर ढाब्यावरून एक कंटेनर (क्रं.आर.जे.01/जी.बी.6351) हा अचानक बाहेर पडून पुण्याच्या दिशेने निघाला.

रात्रीच्या अंधारात अचानक कंटेनर समोर आल्याने दुचाकीस्वारांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटलेे आणि ते पाठीमागून जाऊन या कंटेनरवर जोरात आदळल्याने त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज झाल्याने ढाब्यावरील अनेकजण अपघातस्थळी धावले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर काहींनी घारगाव पोलिसांना  माहिती दिली. मात्र, माहिती मिळूनही घारगाव पोलिस खूप उशिराने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होते, असा संतप्त आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला.

घारगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज शवविच्छेदन गृहात पाठविले आहेत. या अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर व त्याचा चालक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.