Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Ahamadnagar › शेवगाव-पाथर्डीला सर्वाधिक निधी दिला

शेवगाव-पाथर्डीला सर्वाधिक निधी दिला

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:11PMशेवगाव/ढोरजळगाव : प्रतिनिधी 

ग्रामविकास खात्यात पुण्य कमवता येते. म्हणून आपण हे खाते घेतले. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न तुमच्यासाठी होते. ते यामुळे पूर्ण करता येते. आजपर्यंत सर्वात जास्त निधी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाला दिल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ढोरजळगाव येथील कार्यक्रमात सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ढोरजळगाव शे ते वडूले, ढोरजळगाव ने ते बडेवस्ती या 7 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामास प्रारंभ व शेवगाव शहरातील ग्रामविकास योजनेतंर्गत महात्मा फुले भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा ना. मुंडे यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी आ. मोनिका राजळे होत्या. खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब मुरकुटे, प्रा. भानुदास बेरड, अमित पालवे, बीड जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, बीडच्या जि. प. सदस्या अनिता मुंडे, राजाभाऊ मुंडे, जि. प. सदस्य राहुल राजळे, पं. स. सदस्य सुभाष केकाण, शेवगावच्या नगराध्यक्षा राणी मोहिते, नगरसेवक अरुण मुंडे, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युजंय गर्जे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, पाथर्डीचे अध्यक्ष माणिकराव खेडकर, अमोल गर्जे आदी उपस्थित होते.

ना. मुंडे म्हणाल्या, नगर हा पवित्र जिल्हा आहे. त्या सर्व शक्तींना स्मरुन प्रार्थना करते की माझ्यावरील भावना कमी करू नका. मला आशीर्वाद देताय, हे तुमच्या नजरेतून कळते. पाच वर्षांत 30 हजार किमी रस्ते ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्याचा विचार आहे. ज्या योजनेला मी माझे नाव देते, त्या यशस्वी होतात. कारण त्या योजना तुम्हाला पुढे ठेऊन केलेल्या असतात. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 30 रस्त्यांच्या 140 किमी कामासाठी 76 कोटींचा निधी दिला आहे. नदीपुनरुज्जीवन, जलयुक्त शिवार करीता 34 कोटी 57 लाख रुपये दिले. स्व. मुंडे यांचे नाव जगाला विसरू द्यायचे नाही. त्यांच्या अधुर्‍या स्वप्नांना  पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी साद ना. मुंडे यांनी यावेळी घातली.

आ. राजळे म्हणाल्या, स्व. गोपीनाथ मुंडे यांची आमच्यावर सावली आहे. त्यांच्या आशीर्वादानेच या मतदारसंघात पहिली महिला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परळीपेक्षा कणभर झुकते माप या मतदारसंघाला मिळाले आहे. दोन्ही तालुक्यांत जलयुक्तच्या माध्यमातून 170 बंधारे झाले आहेत. शेवगाव व पाथर्डीची पाणी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. विकासासंदर्भात मुंबईला बैठक झाली की राष्ट्रवादीचे नेते तालुक्यात संभ्रम निर्माण करतात.  शेवगाव तालुक्याचा प्रतिनिधी नसल्याने विकास खुंटल्याचा आरोप करतात. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍यांने स्व. गोपीनाथ मुंडे व ना.पंकजा मुंडे यांच्यावर आरक्षण मुद्यावर बिनबुडाचे आरोप केले. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. भविष्यात दोन्ही तालुके आपल्या पाठिशी उभे राहतील, असा विश्‍वास आ. राजळे यांनी ना. मुंडे यांना दिला.

यावेळी बापूसाहेब भोसले, गणेश कराड, तुषार वैद्य, अ‍ॅड. दिनकरराव पालवे, पाथर्डीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, दिनेश लव्हाट, मधुकर कराड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बापूसाहेब पाटेकर यांनी केले.  अनंता उकिर्डे यांनी आभार मानले.

आ.मुरकुटेंची घाडगेंना निमंत्रण

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक व गत विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव घाडगे यांनी भाजपात प्रवेश करावा असा  आग्रह धरला.  त्या भागात नात्यागोत्याचा फंडा आहे. घाडगे यांच्या नात्यागोत्यामुळे भाजपाला फायदा होईल, असे मत आ. मुरकुटे यांनी व्यक्त केले, मात्र घाडगे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.