Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Ahamadnagar › मराठा शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या!

मराठा शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या!

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 10:22PMनगर : प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात 507 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये मराठा व कुणबी समाजातील 304 शेतकर्‍यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविली होती. त्यानुसार ही माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 50 टक्के शेतकर्‍यांचे वारस शासनाच्या मदतीस पात्र ठरले नाहीत. 

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याची सुरुवात विदर्भात झाली. त्यानंतर हे लोण मराठवाड्यात आले. पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषत: नगर जिल्ह्यात पाऊसपाणी व्यवस्थित होत आहे. धरणांचे पाटपाणी जवळपास सर्वच तालुक्यांत फिरत आहे. काही तालुके वगळता सर्वच जिल्हा बागायती म्हणून राज्यभर ओळखला जात आहे.  शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय असल्याने येथील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांपेक्षा चांगली आहे.  त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जाणारच नाही, असे एकेकाळी ठामपणे सांगितले जात होते. मात्र, हा समज 2003 साली एका शेतकर्‍याने गळफास जवळ करून खोटा ठरविला. त्यानंतर नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

राज्यभरात मराठा व कुणबी समाजच मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती म्हणावी अशी पिकत नाही. पिकलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. पीक लागवडीसाठी घेतलेले कर्ज देखील शेतमालाच्या विक्रीतून हाती लागत नाही. त्यामुळे  शेतकरी वर्गात मोठे नैराश्य आलेले आहे. यामध्ये मराठा आणि कुणबी समाजाची मोठ्या प्रमाणात होरपळ होऊ लागली आहे. त्यामुळे  मराठा समाज आर्थिकदृष्ट्या खचू लागला आहे. त्यातून शेतकरी गळफास जवळ करू लागला आहे.  त्यामुळेच हा समाज आरक्षण व इतर विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. या समाजाचा असंतोष लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजासाठी आतापर्यंत काय केले आणि आगामी काळात काय करता येण्याजोगे आहे, याचा अभ्यास सुरू केला आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांत जिल्हाभरातील किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यामध्ये मराठा व कुणबी समाजातील किती शेतकर्‍यांचा समावेश आहे, याचा जिल्हानिहाय अहवाल शासनाने गेल्या महिन्यात मागविला होता. त्यानुसार 2013 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण 507 शेतकर्‍यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे पुढे आले आहे. यापैकी 203 शेतकरी हे इतर जातीचे असून, तब्बल 60 टक्के शेतकरी हे मराठा व कुणबी समाजाचे आहेत. मराठा समाजातील 291 व कुणबी समाजातील 13 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. 

या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफी योजना आणली गेली होती. युती शासनाने देखील कर्जमाफी योजना लागू केली आहे. परंतु, याचे निकष अधिक किचकट असल्याने शेतकर्‍यांना म्हणावा असा लाभ झालेला नाही. सरकारने जनजागृती बरोबरच शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल आणि त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या  स्वावंलबी कसा होईल, यादृष्टीने ठोस उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सतरा वर्षांत 655 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या 

जिल्ह्यातत 2001 ते ऑगस्ट 2018 या सतरा वर्षांच्या कालावधीत तब्बल 655 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी फक्‍त 349 शेतकर्‍यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनाने अदा केली आहे. उर्वरित 306 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून अद्याप उपलब्ध झालेली नाही.