Thu, Apr 25, 2019 21:30होमपेज › Ahamadnagar › काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसा दे!

काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसा दे!

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:55PMशेवगाव : रमेश चौधरी

उष्णतेने तापलेल्या शेतकर्‍यांच्या आता पावसाकडे नजरा लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात सुर्याच्या तप्त किरणाने कासावीस झालेली जनता पावसाच्या सरीने वातावरणात गारवा येण्याची अगदी आतुरतेने वाट पाहात आहे. हा तालुका पाणी टंचाईने सावरला असला तरी उष्णतेच्या लाटेने बावरला आहे.

मे महिना हा कडक उन्हाच्या कहरात सरता सरेनासा झाला आहे. ही उष्णतेची झळ नागरिकांना नको नकोशी झाली आहे. उगवणारा प्रत्येक दिवस तप्त वातावरणाचा राहिल्याने बाजारपेठा सुनसान झाल्या आहेत. सकाळी अकरा वाजण्याच्या पुढे वाहतूक ओस पडत आहे. विद्युत पंखे, कुलर महिन्यापासून फिरते आहे. त्यातूनही गरम हवेचा दुखावा मिळत आहे. झाडाखाली उष्ण झळयाचा शेक बसतो. अशा यातनेत ओसाड व खडकाळ भागात असणार्‍या नागरिकांनी आपला जीव मुठीत ठेवला आहे. गरमट वातावरणात सर्वांच्या चेहर्‍यावरचे हसू मावळले आहे.

यातून कधी सुटकारा मिळणार याची ओढ लागली असून मान्सून डोक्यावर आला असताना उष्णतेचा आणखीनच कहर झाला आहे. अशा उन्हात कोणतेही काम करणे म्हणजे आजाराला निमंत्रण दिल्यासारखे असता शेतकरी वर्गाला कष्टाशिवाय पर्याय नसल्याने या आगीच्या छायेत तो शेतीची पूर्व मशागत करताना दिसून येतो. सायंकाळी घरी येतो आणि फणफण करीत आराम करतो. नको ती शेती नको ते उत्पन्न अशी त्याची अवस्था झाली असून परावलंबी जीवनाला तो कंटाळल्यागत झाला आहे.

उष्णतेच्या यातनेतून सुस्कारा मिळण्यासाठी सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. 8 जूनला मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन खर्‍या अर्थाने पावसाळा सुरू होणार आहे, मात्र वेळेवर पाऊस बरसत नाही हा गत अनुभव आहे. लवकरच मान्सून येणार हा हवामानाच अंदाज ऐकता ऐकता बहिरेपणा आला आहे. पहिला पाऊस हा उष्णतेच्या वाफा निघणारा ठरतो. त्याने शरीराची काहिली होते. जोरदार पाऊस होऊन पाणी पाणी झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो आणि असाच पाऊस होऊ दे हिच प्रार्थना सर्वमुखातून चालू आहे.

यंदा तीव्र उन्हाळा भासला जात असला तरी नाथसागराच्या कृपेने आत्तापर्यंत पाणी टंचाई सावरली आहे, परंतु पावसाळा लांबल्यास काही गावांना याची झळ  निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी मनसोक्त पाऊस झाला. त्याने पाण्याची पातळी वाढली. परिणामी ऊसाचे क्षेत्र वाढले आताही पाणीपातळी आटली गेल्याने अनेक क्षेत्रातील ऊस जळाला आहे. जनावरांचा हिरवा चारा दिसेनासा झाला आहे. मोठमोठे वृक्ष सुकले गेले आहेत. रानोमाळ दिसणार्‍या वन्य प्राण्यांनी पाण्याच्या दिशेने स्थलातंर केले आहे. पशुपक्षीही दुर्मिळ झाले आहेत, वसंत ऋतुला येणारा बहर दृष्टीआड झाला आहे.
सर्वच दृष्टीकोनातून आता पावसाची नितांत गरज झाली असून भूतलावर प्राण्यांची करुणा निसर्गाला येऊ दे आणि धो धो पाऊस बरसू दे असाच धावा केला जात आहे.