Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Ahamadnagar › शौचालयासाठी महिन्याची मुदत

शौचालयासाठी महिन्याची मुदत

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातल्या सरकारी व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शौचालय बांधण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ज्या शाळांमध्ये शौचालय बांधलेले नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिली.जिल्हा परिषदेसह खाजगी शाळांमध्ये शौचालयांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. अनेक शाळांमध्ये शौचालयांची वानवा आहे. विद्यालयांमध्ये विशेषतः मुलींसाठी शौचालय नसल्याने कुचंबणा होते. शौचालय नसल्याने मुलींना शिक्षण सोडावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाळांमध्ये शौचालये बांधण्याची मागणी होत आहे.

केंद्र व राज्य शासन घरोघर शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देत असुन यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यासोबतच लाखो रुपयांचा निधी जनजागृती करण्यासाठी हि खर्च करण्यात येतो. शासनाकडून तर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध पथकांची नेमणुक करुन उघडयावर शौचास बसणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र ज्या ठिकाणी मुलांवर स्वच्छतेचे संस्कार होऊ शकतात असा अनेक शाळांमध्ये शौचालये नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शाळांमध्ये तर शौचालय नाही आणि जेथे आहे ते शौचालये वापरण्या योग्य नाहीत.

राज्यातील जवळपास साडे पाच हजार शाळांमध्ये शौचालये नसल्याचे मध्यंतरी सर्वेक्षणावरून समोर आले होते. एकीकडे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याचे सांगण्यात येत असतांना दुसरीकडे शाळांमध्ये शौचालयेच नसल्याने जिल्हा हागणदारीमुक्त कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी शौचालयाची सुविधा आहे. मात्र मुलींसाठी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने अशा शाळाही रडारवर घेण्याचे ठरवले आहे.