Wed, Apr 24, 2019 12:09होमपेज › Ahamadnagar › शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMमढी : वार्ताहर 

पाथर्डी तालुक्यातील एका आश्रम शाळेतील शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करून अश्‍लिल चाळे केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. त्यानुसार दोन शिक्षकांना पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक दिनीच्या हा प्रकार उघडकीस आला असून, गुरू-शिष्याचा पवित्र नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ही शासनमान्य आश्रमशाळा असून, तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत 50 मुली व 70 मुले शिक्षण घेतात. याबाबत एका विद्यार्थिनीच्या नातेवाईकाने मंगळवारी (दि.4) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आश्रम शाळेतील लिंबाच्या झाडाजवळ शिक्षक ईश्वर सुखदेव सुरसे (रा. चितळी, ता. पाथर्डी) याने पाणी पिण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला बोलावून चौकशी केली. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. 

हा प्रकार तिने मावशीला सांगितला. त्यानंतर मुलीची मावशी अन्य नातेवाईकांसोबत आश्रमशाळेत गेली. तेथे अन्य मुलींनी गेल्या काही दिवसांपासून या शिक्षकांकडून विविध प्रकारे कसा त्रास दिला जातो, याची माहिती दिली. त्यांची हकीकत ऐकल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी या विद्यार्थिनींसह पोलिस ठाण्यात धाव घेत अधिकार्‍यांकडे दाद मागितली. 

शिक्षकांच्या त्रासाला कंटाळलेल्या आठ ते दहा मुलींनी पोलिसांना घडलेले सर्व प्रकार सांगितले. पाचसहा दिवसांपूर्वी यातील एका शिक्षकाने रात्री नऊ व रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका विद्यार्थिनीला मान दाबण्यास सांगून, दुसरीचा विनयभंग केला. इतर मुलींना सुद्धा दोन्ही शिक्षक वेळोवेळी असाच त्रास देतात, असे सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी कर्मचार्‍यांसह आश्रमशाळेला मंगळवारी (दि.4) रात्री उशीरा भेट दिली.

तो पर्यंत अन्य विद्यार्थिनी झोपी गेल्या होत्या. मुलींच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ईश्वर सुखदेव सुरसे (रा.चितळी, ता.पाथर्डी) व नामदेव बबन धायतडक (रा.पालवेवाडी, ता.पाथर्डी) या दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरूद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अ‍ॅट्रॉसिटी) व पोस्को कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपअधीक्षक मंदार जावळे हे करीत आहेत.  दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जिल्ह्याच्या विविध भागात राहणारे पालक आश्रमशाळेतून आपल्या मुलामुलींना घरी घेऊन गेले आहेत. या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध होत असून, या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.