Wed, Aug 21, 2019 19:39होमपेज › Ahamadnagar › मोहा ग्रामपंचायतीत गडबड की घोटाळा!

मोहा ग्रामपंचायतीत गडबड की घोटाळा!

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:59PMजामखेड : मिठूलाल नवलाखा

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दत्तक  घेतलेल्या तालुक्यातील मोहा गावात सुरू असलेल्या अनेक कामांचा बोजवारा उडाला आहे. गावातील काही महाभाग याचा उपयोग स्वतः व आपल्या कुटुंबासाठी करत आहे, अशी माहिती उघड झाली आहे. या दत्तक गावाकडे पालकमंत्री शिंदे यांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी कलाकेंद्राला परवानगी देण्यावरून विशेष ग्रामसभेत गोंधळ उडाला होता.

जामखेड तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेले मोहा गाव. येथे ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला हापटेवाडी, रेडेवाडी, नानेवाडी, डोंगरेवस्ती, इंगळे वस्ती, पांडव वस्ती हा भाग जोडलेला आहे. येथील लोकसंख्या अंदाजे तीन हजार एवढी आहे. हे गाव दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांनी दत्तक घेतले आहे. सुरुवातीला ना. शिंदे यांनी सदर गावाला भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गावाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.  शासकीय योजनांची माहिती दिली आणि यामध्ये गावाचाही सहभाग असावा असे सांगितले.

त्यानंतर गावाचा समावेश जलयुक्तमध्ये करण्यात आली. ही कामे करतांना अधिकार्‍यांनी पाहिजे असे लक्ष दिले नाही. त्यामुळे कामे निकृष्ट झाली आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत गावामध्ये झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रोपवाटिका अशी अनेक कामे सुरू करताना गावातील वयोवृद्ध व्यक्तींना कामावर दाखवून बिले काढली आहेत. या कामावर एकाच घरातील मजुरांना कामावर घेण्यात आले आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी, गावाला पिण्याचे पाणी सोडण्यासाठ,ी रोजगार हमी कामासाठी एकच व्यक्ती असल्याचे समजते. यामध्ये अधिकारी देखील सामिल आहेत अशी चर्चा आहे.

रस्त्यांची कामे काही प्रमाणात झालेली आहेत. यामध्ये मोहा, नानेवाडी, मोहा रामेश्वर, मोहा घुले वस्ती या रस्त्याचे काम झाले आहे, परंतु गावातील रस्ते आजही झालेली नाही. रमाई आवास योजनेंतर्गत गावातील साठ घरकुलांची कामे झाली असली तरी काही लोकांना अजून मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. दलित वस्तीतील गटारींची कामे निकृष्ट दर्जाचे आहेत

दोन दिवसांपूर्वी मोहा ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंचांची निवड करण्यात आली आणि लगेच मोहा हद्दीत असणार्‍या कलाकेंद्रांना परवानगी देण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत कलाकेंद्रांना परवानगी देण्यावरून गोंधळ उडाला आणि ही सभा तहकूब करण्यात आली. या मुद्द्यावर मोहा गाव चर्चेत आले. कलाकेंद्रांना देण्यात येणार्‍या परवानगीमुळेच सभा वादग्रस्त का ठरली या मुळाशी गेल्यानंतर असे समजले की आतापर्यंत जेवढ्या पदाधिकार्‍यांनी कलाकेंद्राला परवानगी दिली, यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड झालेल्या आहेत. यातील वाटण्या न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता, ही बाब पुढे आली आहे

परंतु गावातील सुरू असलेल्या निकृष्ट कामाबाबत कोणीही तक्रार का करत नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचे दत्तक असलेल्या गावात जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर तालुक्यातील इतर गावांबद्दल न विचारलेले बरे. स्वतः तालुक्याकडे मंत्री महोदयांना लक्ष देण्यास वेळ नाही. अनेक प्रमुख विभागात अधिकारी नाही, कर्मचारी नाहीत मग कारभार कसा चालणार. घोटाळा उघडकीस येत असताना मंत्री त्यावर भाष्य करत नाही ही शोकांतिका आहे.