Sat, Jul 20, 2019 08:50होमपेज › Ahamadnagar › मोदी सरकारने दलाल हद्दपार केले : जावडेकर

मोदी सरकारने दलाल हद्दपार केले : जावडेकर

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी सांगत की, मी सर्वसामान्य जनतेला 100 रुपये पाठवतो, मात्र त्यातील केवळ 10 रुपयेच मिळतात. मात्र, मोदी सरकारने मधले सर्व दलाल हद्दपार करून अनुदानाचे 100 पैकी 100 रुपये सर्वसामान्यांच्या जनतेच्या खात्यात पोहोच केले आहेत. यामुळे भाजपच्या कामावर जनता समाधानी असून, येणार्‍या सर्व निवडणुकाही आम्हीच जिंकू असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

जावडेकर पुण्याहून शिर्डीला जात असतांना खा. दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात थांबले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी व गटनेते सुवेंद्र गांधी यांनी मंत्री जावडेकर यांचे स्वागत केले. जावडेकर म्हणाले की, राज्यात व केंद्रात चांगला कारभार करुन भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीचा काळा कारभार उखडून टाकला. त्यामुळेच देशातील प्रत्येक निवडणुक भारतीय जनता पार्टी जिंकत आहे.

म्हणून विरोधकांची भाजपाविरुद्ध कोल्हेकुई चालू आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे अमुलाग्र बदल केंद्र सरकारने घडवून आणले आहेत. शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. यावेळी भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, गौतम दीक्षित, किशोर डागवाले, श्रीकांत साठे, नाना भोरे, विश्वनाथ पोंदे, सागर गोरे, धनंजय जामगांवकर, शिवाजी दहिंडे, छाया रजपूत आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.