होमपेज › Ahamadnagar › मेसेज 11 लोकांना पाठवा, ऊसाला तोड येईल; सोशल मीडियावर शेतकऱ्यांची थट्टा

मेसेज 11 लोकांना पाठवा, ऊसाला तोड येईल; सोशल मीडियावर शेतकऱ्यांची थट्टा

Published On: Mar 09 2018 1:31AM | Last Updated: Mar 09 2018 10:06AMढोरजळगाव : वार्ताहर

उसतोडणीसाठी आता सोशल मीडियाद्वारे ऊसमालकांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम चालू असून ही एकप्रकारे थट्टाच केल्याचा शेतकर्‍यांनी आरोप केला आहे.

‘हा मेसेज 11 लोकांना पाठवल्यास तुमच्या उसाला तोड येईल’ किंवा ‘असा मेसेज कुठे मिळेल का की तो 11 लोकांना पाठवल्यास उसाला तोड मिळेल?’अशा विविध आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावरून सध्या फिरत आहेत. असे मेसेज लोकांचे मनोरंजन जरी करी असले तरी कोणाच्याही भावना यामुळे दुखावल्या जाऊ नयेत याची मात्र कोणीही काळजी घेताना दिसत नाही.

अगोदरच ऊसतोडणीसाठी हैराण झालेल्या ऊसमालकांना ऊस तुटून जाण्याची चिंता सतावत आहे. उसाचे पिक विक्रमी निघाल्याने यंदा तोडणीसाठी मजूर अपुरे पडत आहेत.रितसर नोंदी करूनही काहींच्या उसाला उशिरा तोड मिळते. त्यामुळे उसाचे उत्पन्न घटण्याची भीती असते. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्यातच उसाला जास्त पाण्याची गरज भासत असल्याने काही उसाच्या पिकांना वर्ष उलटले तरी अद्यापही तोड आलेली नसल्याने या पिकांचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

सध्या विविध व्यासपीठांवर उसाच्या तोडणीच्या चर्चांना ऊत आला आहे. ऊस कसा तोडून द्यावा हाच यक्ष प्रश्‍न सध्या शेतकर्‍यांसमोर उभा ठाकलेला आहे. त्याचे लोण आता सोशल मीडियावरही पसरले असून वरील आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहेत. शेतकर्‍यांच्या कपाळावरच्या आठ्या अगोदरच वाढलेल्या असताना आता त्यांची एक प्रकारे थट्टाच केली जात असल्याच्या भावना काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.