Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Ahamadnagar › राहुरीत मोबाईल शॉपी फोडली

राहुरीत मोबाईल शॉपी फोडली

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 14 2018 12:48AMराहुरी : प्रतिनिधी 

राहुरी शहरातील एका मोबाईल शॉपीच्या दुकानाचा छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख  रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच शहरातून 2 दुचाकी चोरून नेल्या आहेत. त्यामुळे राहुरीतील वाढती गुन्हेगारी संपुष्टात आणण्यात पोलिसांना अपयशच येत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.शहरात अख्तरभाई कादरी यांचे बॉम्बे कलेक्शन मोबाईल शॉपी हे दुकान नगर-मनमाड रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. सकाळी अख्तर कादरी हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा उचकाटलेला दिसल्याने दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच दुकानातील साहित्याची मोठ्या प्रमाणात उचकापाचक करण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजची पाहणी केली असता, चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधत दुकानावरील पत्रा कापून आत प्रवेश केल्याचे दिसत होते. चोरट्यांनी दुकानाीत लॅपटॉप, एलसी डी टीव्ही व मोबाईल असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याबाबत अख्तर कादरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,  गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशीही 2 दुचाकी शहरातून चोरी झाल्याची माहिती समजली आहे. एकंदरीतच राहुरी शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून चोरट्यांच्या उद्रेकामुळे व्यापारी, महिलांसह सर्वसामान्यही दहशतीखाली आले आहेत. पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका असल्याने चोरट्यांची हिंमत वाढत असल्याची टीका साधत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी संताप व्यक्‍त केला आहे. शहरातील बॉम्बे कलेक्शन दुकान फोडण्याची दुसरी वेळ असून अनेक दुकाने फोडून लाखो रुपयांच्या चोर्‍या झालेल्या आहेत. मात्र पोलिसांना एकही गुन्हेगाराचा शोध घेता आलेला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी लक्ष देत राहुरीची वाताहात थांबवावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात होत आहे.