Sun, Mar 24, 2019 06:43होमपेज › Ahamadnagar › दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनविले मोबाईल अ‍ॅप

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनविले मोबाईल अ‍ॅप

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:06AMकर्जत ः प्रतिनिधी

दुर्गम भागातील बंडगरवस्ती शाळेतील मुलांचे ज्ञान पाहून सर्व पाहुणे चकीत झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः मोबाईल अ‍ॅप तयार केल्याचे सांगितल्यावर उपस्थितांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली. या शाळेची दिल्ली येथे आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगसाठी देशातील 35 शाळांमध्ये निवड झाली होती.

कर्जत येथे आयोजित शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील सात वैशिष्ट्यपूर्ण प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती पुष्पाताई शेळके यांचे हस्ते झाले. 

अशोक खेडकर, राजेंद्र गुंड, बाळासाहेब सांळुके, उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, लालासाहेब सुद्रिक, राहुल नवले, सोमनाथ गोपाळघरे, सरपंच वसंत कांबळे, राहुल नवल आदींसह शिक्षक यावेळी उपस्थित होते.

यावेळी कर्जत तालुक्यातील विविध शाळांनी राबविलेले विविध उपक्रमांचे स्टॉल लावले होते. यामध्ये बंडगरवस्ती येथील शाळेचे शिक्षक विक्रम अडसूळ व सहशिक्षका कविता बंडगर यांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांचे सर्वांनी कौतुक केले. शाळेतील मुलांनी मोबाईल अ‍ॅप बनविला आहे. याशिवाय घुमरी, थेरवडी, खैदानवाडी, दुधोडी, शेगुड, म्हाळंगी या शाळांनीही चांगले प्रदर्शन केले.

शेळके म्हणाल्या, बालवयातच उच्च गुणवत्ता व  शिक्षण प्राप्त करण्याचे बाळकडू मिळते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज होण्याची दिशा शिक्षकांनी द्यावी. यासाठी अशी शिबिरे अत्यंत उपयुक्त आहेत.

साळुंके म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी सातत्याने सर्वांगीण प्रयत्न व्हावेत. राजेंद्र गुंड म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा आता कात टाकीत असून, याचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा.सूत्रसंचालन प्राचार्य श्रावण गिरी, संतोष खंडागळे व रवींद्र राऊत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाबासाहेब पवार यांनी मानले.