Sun, Mar 24, 2019 08:33होमपेज › Ahamadnagar › दूषित पाण्याबाबत दिशाभूल!

दूषित पाण्याबाबत दिशाभूल!

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:46PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेकडून नळाद्वारे शहरात दूषित व जंतुयुक्‍त पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे जागरुक नागरिक मंचातर्फे उघड करण्यात आल्यानंतर सदरची तपासणी संशयास्पद असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. सुहास मुळे यांच्याकडून तथ्यहीन व निराधार माहितीद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावाही पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.सरकारी प्रयोगशाळेतून करण्यात आलेल्या पाण्याच्या तपासणीत चितळे रोड व माळीवाडा परिसरात आरोग्याच्या दृष्टीने घातक असा जंतुयुक्‍त पाणीपुरवठा केला जात असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला असल्याचे सुहास मुळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात मनपा प्रशासनाने सर्व आरोप खोडून काढत तात्काळ खुलासा सादर केला आहे.

विळद जलशुध्दीकरण केंद्रातून वसंत टेकडी येथे येणार्‍या पाण्याची नियमित तपासणी केली जाते. वसंत टेकडी येथे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असून तपासणीनंतरच शहरात पाणी वितरीत केले जाते. शहरातील पाणी वाटपावेळीही मनपाकडून विविध भागांतील पाण्याचे नमुने घेऊन ते सरकारी प्रयोग शाळेतून तपासले जातात. त्यांच्या अहवालानुसार व सूचनेनुसार वेळोवेळी दखल घेवून शुध्द पाणी पुरवठा होईल याची दक्षता पाणीपुरवठा विभागाकडून घेतली जाते. 

अशी सर्व परिस्थिती असतांनाही सुहास मुळे यांनी महापालिकेकडे कुठलीही तक्रार न करता वर्तमानपत्रात तथ्यहीन व निराधार माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे. त्यांनी केलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही संशयास्पद आहे. नागरिकांनी अशा तथ्यहीन माहितीवर व अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान, सुहास मुळे हे नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले असून, भविष्यात असा खोडसाळपणा करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते, असे मत मनपातील एका अधिकार्‍याने व्यक्‍त केले.