Fri, Apr 26, 2019 03:59होमपेज › Ahamadnagar › नगरच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करणार!

नगरच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करणार!

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

नगर शहरातील वाढती गुंडगिरी, गुन्हेगारी याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना केल्या जातील. पोलिस प्रशासनाकडून त्याचा दैनंदिन अहवाल घेतला जाईल, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

केडगाव हत्याकांडानंतर घडलेल्या दगडफेकप्रकरणी शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत शिवसेना नेते व पदाधिकार्‍यांनी केलेल्या मागणीलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने रविवारी (दि.15) पुकारलेला महामोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. काल (दि.11) सकाळी उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, रवि वाकळे, मदन आढाव यांनी ना. केसरकर व संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांची भेट घेतली. 

पोलिस अधीक्षक कार्यालयांवरील हल्ला प्रकरणात कलम 333 हटविणे, 500 ते 600 शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आदींबाबत गृह राज्यमंत्री केसरकर यांना निवेदन देण्यात आले. केडगाव हत्याकांडाच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक व कार्यकर्ते जमले होते. तेथे झालेला प्रकार ही संतप्त प्रतिक्रिया होती. पोलिसांनी मात्र शिवसैनिकांवरच गंभीर कलमे लावून गुन्हे दाखल केले.

दुसरीकडे पोलिस अधीक्षक कार्यालय फोडणार्‍यांवरील गंभीर कलमे मागे घेण्यात आली. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे यावेळी केसरकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ना. केसरकर यांनी येत्या आठवडाभरात पुन्हा नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. 

प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना करुन येत्या महिनाभरात नगरमधील गुंडगिरीचा बिमोड केला जाईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या आश्‍वासनानंतर शिवसेनेने 15 एप्रिल रोजी पुकारलेला मोर्चा स्थगित केला असल्याचे शहरप्रमुख सातपुते यांनी सांगितले.

Tags : ahmednagar news, Minister of State for Home Deepak Kesarkar