Sun, Nov 18, 2018 13:38होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात दूध उत्पादक शेतकर्‍यांचे ‘जेलभरो’!

संगमनेरात दूध उत्पादक शेतकर्‍यांचे ‘जेलभरो’!

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:10AMसंगमनेर : प्रतिनिधी

भाजीपाल्यासह दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील दूधउत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्रित येत बसस्थानकासमोर सुमारे अर्धा तास रास्ता-रोको आंदोलन केले. दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे शहर पोलिसांनी 17 आंदोलनकर्त्यांना शासकीय वाहनातून शहर पोलिस स्टेशनला नेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत सातजणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. 
याबाबत शहर पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकजयांच्या दुधाला सरकारने 27 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचे जाहीर केले होते. परंतु तो भाव 20 ते 22 रुपये प्रतिलिटर मिळत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज रविवारी सकाळी दहा वाजता बसस्थानकाजवळ नाशिक-पुणे रस्त्यावर अर्धा तास रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनकर्त्यांना प्रशासनाने समजावून सांगितले. परंतु ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलनकर्त्यांची धरपकड करुन त्यांना शासकीय वाहनातून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 

याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बाळासाहेब यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्ते स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख शरदनाना थोरात, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, बहुजन मुक्ती पार्टीचे संतोष रोहम, दिपक वाळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जोर्वे गावचे उपसरपंच गोकुळ दिघे, शेतकरी नेते सदाशिव हासे, भाऊसाहेब सातपुते, बाळासाहेब जोर्वेकर, रमेश कासार, संजय औटी, बाळासाहेब शिंदे, गणपत शिंदे, शंकर सो.खेमनर, दिलीप राऊत व संतोष कुटे आदी 17 आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून रास्तारोको आंदोलन करत प्रवाशांची अडवणूक केली. या कारणावरून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शरद थोरात, कैलास वाकचौरे, जनार्दन आहेर, दीपक वाळे, संतोष रोहम, बाळासाहेब जोर्वेकर व रमेश कासार या आंदोलकांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.