Sun, Jul 21, 2019 15:08
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › जानकरांच्या बंगल्यावर मोर्चा नेणार

जानकरांच्या बंगल्यावर मोर्चा नेणार

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 19 2018 12:09AMपुणतांबा : वार्ताहर

राज्य सरकारने दूध दरप्रश्‍नी 4 जूनपर्यंत निर्णय न घेतल्यास 5 जूनला दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या शासकीय बंगल्यावर राज्यातील दूधउत्पादकांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दिला.

दूधउत्पादकांना दूधभावात वाढ द्यावी, यासाठी येथून जवळच असलेल्या वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे दि. 3 मे रोजी पहिली ग्रामसभा घेऊन या लूटमारीला वाचा फोडत‘लुटता कशाला फुकटच न्या’ असा नारा देऊन दि. 3 ते 9 मे या कालावधीत दूधउत्पादक संघर्ष समितीने फुकट दूधवाटप करत राज्यभर आंदोलन केले. मात्र, सरकारने यावर तुटपुंज्या अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकर्‍यांना फारसा फायदा होणार नसल्याने दूधउत्पादकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दूध दर प्रश्‍नी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी काल लाखगंगा येथे आ. कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस औरंगाबाद, नगर, नाशिक, जालना जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकरी विशेषत: महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आ. कडू यांनी राज्य सरकारचा निषेध करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर केवळ आश्‍वासन देऊन फसवणूक करीत असल्याचे त्यांनी म्हटले. दूधदर प्रश्‍नी 30 मेपर्यंत निर्णय न घेतल्यास 1 जूनला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर भाकड गाय दान करण्यात येणार असूून यानंतरही ठोस निर्णय झाला नाही, तर ना. जानकर यांच्या बंगल्यावर 5 जूनला मोर्चा काढण्यात येईल. 6 जून रोजी मुंबईत शिवराज्याभिषेक साजरा करून त्याच ठिकाणी प्रश्‍न मार्गी लागत नाही तोपर्यंत मुक्काम ठोकण्यात येणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले.

आंदोलनास उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा देऊन 5 जूनला राज्यातील दूधउत्पादकांनी ना. जानकार यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार, कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष प्रकाश कुदवळ, अशोक सब्बन, महिला शेतकरी संघटनेच्या नंदा जाधव, लता गायकवाड, धनंजय धोर्डे, सरपंच दिगंबर तुरकणे, केशव मोरे आदींची भाषणे झाली.