Fri, Jul 19, 2019 01:25होमपेज › Ahamadnagar › दुसर्‍या दिवशीही दूध आंदोलन

दुसर्‍या दिवशीही दूध आंदोलन

Published On: Jul 18 2018 1:52AM | Last Updated: Jul 17 2018 10:08PMदाढ खुर्द : वार्ताहर

राहाता तालुक्यातील दाढ खुर्द परिसरातील शेतकर्‍यांनी काल दुसर्‍या दिवशीही रस्त्यावर दूध  ओतून  सरकारचा निषेध केला.  दरम्यान, दाढ खुर्दच्या शेतकर्‍यांनी सरकार दूधप्रश्‍नी सर्व मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.दूधबंद आंदोलनामुळे दूध संस्था, दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आली होती. हनुमानवाडी येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी अमृत सेनेचे शाखा प्रमुख नितीन पाबळे यांच्या नेतृत्वाखाली हनुमानवाडी येथे रस्त्यावर वाहने अडवत दूध रस्त्यावर ओतून शेतकरी संघटनेला पाठींबा दिला व सरकारच्या विरोधात घोषणा देत दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी राजीनामा द्यावा, अशी  मागणी केली.

दाढ खुर्द परिसरातील वाड्या-वस्त्यांसह गावात 5-6 हजार लिटर दूध संकलन होत असते. मात्र, दूधबंद आंदोलनामुळे संस्था प्रमुखांनी दूध संस्था बंद ठेवल्या. यामध्ये दाढ खुर्द दूध संस्थेचे अध्यक्ष नारायणराव कहार, सचिव तुकाराम जोरी, संकलक राजेंद्र गायखे यांनी उत्पादकांना दूध बंद करण्याची विनंती करत दूध संस्था बंद ठेवली. जय मल्हार दूध संकलन केंद्र प्रमुख संजय रघुनाथ जोशी, माऊली दूध संकलन केंद्राचे प्रमुख उपसरपंच संजय पर्वत, अंबिकामाता दूध संस्थेचेे प्रा. सुधीर जोशी, प्रभात दूधचे सुनील जोशी, किशोर जोशी यांनी संपात सहभागी होऊन बंद पाळत एकही लिटर दूध न घेता आपापली दूध संकलन केंद्रे बंद ठेवली.  या बंदमुळे  दाढ खुर्द येथील जवळ-जवळ एक दिवसाचे 1 ते 2 लाखांचे नुकसान झाले आह. सरकारने त्वरित 28-30 रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करताना दिसत होते.