होमपेज › Ahamadnagar › पाण्यापेक्षाही दूध झाले स्वस्त

पाण्यापेक्षाही दूध झाले स्वस्त

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 21 2018 12:58AMमंचर : प्रतिनिधी

सध्या दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 28 रुपये असणारा दुधाचा भाव आता 19 रुपये लिटरपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे. गेल्या आठ महिन्यांत दुधाच्या दरात 30 टक्के घसरण झाल्याचा दावा दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केला आहे. त्यामुळे पाण्यापेक्षाही दूध स्वस्त अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु, सध्या दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. उन्हामुळे दुधाचे उत्पादनही थोडेसे घटले असून, 28 रुपये लिटर असणारे दूध सध्या 19 रुपये लिटर दराने विकले जात असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. चार्‍याचे वाढलेले बाजारभाव, औषधचा वाढलेला खर्च, सुग्रास भुशाचे वाढलेले बाजारभाव पाहता दूध व्यवसाय आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र आहे. एवढे होऊनही सरकार मात्र दूध उत्पादक शेतकर्‍यांना बाजारभाव वाढ देण्यासाठी चकार शब्द काढत नाही. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांना आजार होत आहे. हा सर्व वाढलेला खर्च विचार करता सध्या दूध व्यवसाय तोट्यात करावा लागत आहे. पिकांचे ढासळलेले बाजारभावामुळे शेतकरी दूध व्यवसाय करू लागला होता.

परंतु दूध दरही मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांना चार्‍यासाठी लागणारे मका, कडवळ, घास, गवत तसेच कडबा  चार्‍याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. कडब्याची एक पेंढी 30 रुपयांना घ्यावी लागत आहे. तसेच सुग्रास भुसा खाद्यांच्या किंमतीही 1 हजार 100 रुपयांपेक्षा जास्त झाल्या आहेत. सध्या तापमानात झालेल्या मोठ्या प्रमाणात वाढीमुळे दूध देणार्‍या गायींच्या आजारातही वाढ झाली आहे. परिणामी डॉक्टरला होणारा खर्चही भरमसाट वाढला आहे. या सगळ्याचा विचार करता दुध उत्पादक शेतकरी खर्च जास्त व उत्पन्न कमी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.  सध्या दुधाला 19 रुपये लीटर दर मिळत आहे, तर पाणी 20 रुपये लीटर दराने विकले जात असल्याने पाण्यापेक्षाही दूध स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील सात ते आठ महिन्यात दुधाच्या दरात 30 टक्के घसरण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करता सरकारने यावर योग्य निर्णय घेऊन दूग्धजन्य पदार्थ  निर्यातीवर भर द्यावा आणि शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे. 

Tags : Ahmadnagar, Milk, cheaper, water