Mon, May 20, 2019 18:12होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात दूध संकलन ठप्प

जिल्ह्यात दूध संकलन ठप्प

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:40PMनगर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पहिल्याच दिवशी जिल्हातील दूध संकलन पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 165 दूध संघाकडे एक लिटर दूध देखील संकलित झाले नाही.  या आंदोलनामुळे जिल्हाभरातील कायदा व सुव्यवस्था ढासळू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. दरम्यान, नगर तालुक्यातील निमगाव वाघा व  शिराढोण येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी  रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले.

राज्यभरातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून तात्काळ मिळावे, या मागणीसाठी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार कालपासून  दूधपुरवठा रोखण्यास प्रारंभ झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन पूर्णतः ठप्प झाले आहे. जिल्हाभरात दूध संकलन करणार्‍या एकूण 165 दूध संघ आहेत.या सर्व दूध संस्थांमध्ये प्रतिदिन सरासरी  24 लाख लिटर दूध संकलन केले जात आहे.

या आंदोलनामुळे या दूधसंस्थांनी संकलनच केले नसल्याचे पुढे आले आहे.संकलित दूध  टँकरद्वारे मुंबईला पाठवले जात आहे. परंतु आंदोलनामुळे गाड्यांचे नुकसान होईल,  या भीतीने संकलन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सरासरी  पाच कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. 

शिराढोण येथे नगर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी नगर-सोलापूर महामार्गावर दूध ओतून आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. निमगाव वाघा येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दूधाला योग्य हमीभाव मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सोसायटीचे व्हाईस चेअरमन  नाना डोंगरे, दिलीप जाधव, भाऊसाहेब जाधव, भागचंद जाधव, एकनाथ जाधव, मयुर काळे, बाळू बोडखे, भाऊ कापसे, भाऊसाहेब आनंदकर, साधू पुंड, ऋषीकेश बोडखे, अर्जुन पवार आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

मागणी करताच पोलिस संरक्षण उपलब्ध

आंदोलनामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी  जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.मुंबईला दूध टँकर रवाना करण्यासाठी कोणत्याही दूध संघाने वा संस्थेने संरक्षण मागितल्यास तात्काळ  पोलिस संरक्षण देण्यात येईल. जिल्हाबाहेरील काही दूध संस्थांच्या टॅकर्सना पोलिस संरक्षणात जिल्हाबाहेर रवाना केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.